लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील युवा चित्रकार गणेश मोहनराव शिंदे यांच्या चित्रांचे प्रदर्शन एप्रिल २२ ते २८ दरम्यान मुंबईच्या जहांगीर कला दालनामध्ये भरणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन रसिकांना पाहता येईल. लातूर तालुक्यातील निवळी गावचा मूळ रहिवाशी असलेल्या गणेश शिंदे यांचे रेखा व रंगकला पदविकेचे शिक्षण अभिनव कला महाविद्यालय पुणे येथे झाले आहे. त्यांच्या चित्रकलेतील योगदाना बद्दल २०२० मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचा श्री. भीम बी. पुरोहित मेमोरियल पुरस्कार मिळाला आहे. सीमा अवार्ड शो २०२२, ललित कला अकादमीद्वारा आयोजित ६१ वे राष्ट्रीय प्रदर्शन २०२०, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया प्रदर्शन २०१८, सीमा आर्ट मेला, व्हिज्युअल आर्ट्स गॅलरी, नवी दिल्ली, सीमा आर्ट मेला, सीमा गॅलरी, कोलकाता प्रदर्शनाठी गणेश शिंदे यांची निवड झाली होती.
चित्र म्हणजे केवळ रंग आणि रेषांचा खेळ नसतो. ते आपल्या अंतर्मनाशी जोडणारे एक माध्यम असते. चित्र काढताना येणा-या भावना, विचार, अनुभव आणि अभिव्यक्ती हे सगळे मिळून त्याला खरे अर्थ देतात. चित्रविषय खूप व्यापक आहे. त्यामध्ये रुप, रंग, रचना, अवकाश, समतोल आणि क्षणिक अनुभूती यांचा समावेश असतो. हे सगळे विषय केवळ दृश्यकलेपुरते मर्यादित नसून, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि विज्ञान यांच्याशीही जोडलेले असतात. चित्रनिर्मिती ही केवळ काहीतरी बघण्यासारखे तयार करणे नाही, तर ती एक अनुभवाची प्रक्रिया आहे. एक विचार किंवा भावना रंगांमधून आणि आकारांमधून साकार होते.
कधी ते रूप खूप साधं असतं, तर कधी त्यामागे खोल अर्थ दडलेला असतो. कलाकारासाठी चित्रकला ही स्वत:ला शोधण्याची एक प्रक्रिया असते. चित्राचा विषय हा स्थिर नसतो. तो अनुभवातून सतत वाढत जातो, बदलतो आणि समृद्ध होतो. प्रत्येक चित्र एक वेगळा दृष्टिकोन मांडतं आणि एक वेगळी गोष्ट सांगतं. याचा मागोवा गणेश शिंदे यांनी त्यांच्या अमूर्त कला चित्रण या चित्रांच्या माध्यमातून घेतला आहे. येत्या २२ एप्रिलपासून त्यांच्या जवळपास ३५ अमूर्त प्रकारातील चित्रांचे प्रदर्शन जहांगीर कला दालन, मुंबई येथे भरत असून सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत चित्रकार रसिकांना ही चित्रे पाहता येतील. गणेश शिंदे यांना आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाल्यामुळे लातूरच्या चित्रकार रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.