लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या विकासाची गती कायम राखण्यासोबतच या जिल्ह्यातील सांस्कृतिक शिक्षण, क्रीडा यासह इतर क्षेत्रातील अनुकरणीय वारसा जपण्यासाठी पक्षाभिनीवेश बाजूला ठेऊन सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथील पीव्हीआर थियटरमध्ये आयोजित आतंरराष्ट्रीश् चित्रपट महोत्सव शुभारंभनिमित्त बोलतांना केले.
विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे आयोजित तिस-या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ दि. १४ मार्च रोजी सायंकाळी, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, सुप्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, कृउबा सभापती जगदीश बावणे, चित्रपट समिक्षक समर नखाते, पूणे फेस्टिव्हलचे विशाल शिंदे, अदिती अंकलकोटकर, तंत्रज्ञ सौरंभ सांगवडेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शुभारंभाचा चित्रपट पाहीला. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा देतांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व इतर मान्यवर नेत्यांनी लातूर जिल्ह्याला कायम प्रगतीपथावर ठेवले आहे. माजी मंत्री अमित विलासराव देशमुख त्यांना मिळालेला वारसा समर्थपणे पूढे चालवत आहेत. जे जे नवं ते ते लातूरला हवं या भुमिकेतून कायमपणाने विविध योजना व विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या त्या सर्व प्रयत्नांना पक्षअभिनीवेश बाजूला ठेऊन राज्याचा मंत्री म्हणून आपला कायम पाठींबा आणि सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना मांजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, जे जे नवं ते ते लातूरला हवं, ही भूमिका माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नेहमीच राहिली. त्यांचा तो वारसा जपण्याचाच
एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे लातूरला आयोजन करण्यात आले आहे, जगात नेमके नवीन काय घडते आहे, याचे ज्ञान लातूर व परिसरातील जनतेला व्हावे त्यातून त्यांना अनेक नवीन गोष्टी शिकता याव्यात ही या आयोजना पाठीमागची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, ही संस्कृती जपण्याची आणि पुढे चालवण्याचा या चित्रपट महोत्सव आयोजना पाठीमागचा आणखीन एक उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पूढे बोलतांना ते म्हणाले, दुष्काळ आणि कोरोना महामारीमुळे लातूर फेस्टिवलच्या आयोजनात खंड पडला आहे. आगामी काळात हा फेस्टिवल पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. चार दिवस चालणा-या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात
येणा-या चित्रपटांनां कलारसिक मंडळींनी भरभरुन प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार संजय बनसोडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री असताना सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून कलाप्रेमी सिने रसिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब असून अभिनयाची कला जोपासली जावी, हा यामागील मुख्य उद्देश असून लातूर फेस्टिव्हल लोकनेते विलासराव देशमुख यांनी सुरु केला, पण सध्या त्यात खंड पडला आहे, तो लातूर फेस्टिव्हल पुन्हा सुरु करावा अशी विनंती करीत या फिल्म फेस्टिव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यानी केले.
यावेळी प्रस्ताविकपर भाषणात बोलताना, पुणे फिल्म फेस्टिव्हलचे संकल्पक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर तसेच सिनेरसिकांचे शब्दसुमनाने स्वागत करून फिल्म फेस्टिव्हल संदर्भात विस्तृतपणे माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणन केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी तेथे आवर्जून उल्लेख केला. यावेळी बोलताना आमदर विक्रम काळे म्हणाले की, या फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्वणी सिनेरसिकांना मुंबईनंतर लातुरात उपलब्ध करून देण्यात आली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.