लातूर : प्रतिनिधी
कर्नाटकात महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसचालकाच्या तोंडाला काळे फसले आणि चालकाला मारहाण केली. या पार्श्वभुमिवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून कर्नाटकात जाणा-या एसटी बसच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र लातूर आगारातून कर्नाटकात जाणा-या बसेसच्या फे-या नियमितपणे सुरु आहेत.
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्रातील एसटी बस चालकाला मारहाणीची घटना घडल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांतील कर्नाटकात जाणा-या बस फे-या बंद करण्याचे आदेश काढले आहेत. कोल्हापूर विभागातून कर्नाटकात जाणा-या बस गाड्या बंद आहेत. लातूर जिल्ह्याच्या सीमेवर कर्नाटक आहे. लातूरहून कर्नाटकात जाणारे आणि कर्नाटकातून लातूरला येणा-या प्रवाशांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळे कर्नाटकातून असंख्य बसेस लातूर विभागात येतात आणि लातूर विभागातूनही अनेक बसेस कर्नाटकात नियमित ये-जा करतात. कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रकारानंतरही लातूरहून कर्नाटकात जाणा-या बसफे-या नियमित सुरु आहेत.
लातूर विभागातून लातूर आगाराच्या कर्नाटकात जाणा-या ७ आणि कर्नाटकातून लातूर आगारात येणा-या ७ असा १४ फे-या नियमित होतात. निलंगा आगारातून ६ जाणा-या व ६ येणा-या अशा १२ तर उदगीर आगारातून २३ जाणा-या व २३ येणा-या असा ४६ एकुण ७२ फे-या नियमित होत असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या लातूर विभागाचे अधिकारी संदीप पडवळ यांनी दिली.