पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले. कारण, राज्य शासनाने एसटी प्रवासभाड्यात सवलत देणा-या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि ‘महिला सन्मान योजना’ सुरू केल्यापासून एसटी पुणे विभागाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षांत दर वर्षी उत्पन्नाचा आलेख चढता राहिला आहे. यातून उत्पन्नात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
पुणे विभागात २०२२-२३ मध्ये १६२ कोटी, २०२३-२४ मध्ये ४२७ कोटी रुपये, तर एप्रिल २०२४ पासून गेल्या सात महिन्यांत ३४८ कोटी रुपये इतके उत्पन्न एसटीच्या पुणे विभागाला मिळाले आहे. स्वातंर्त्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने २६ ऑगस्ट २०२२ पासून ७५ वर्षांपुढील ज्येष्ठांना राज्यभरात विनामूल्य प्रवासाची सवलत देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ सुरू केली. त्यानंतर १७ मार्च २०२३ पासून महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत देणारी ‘महिला सन्मान योजना’ सुरू झाली. या दोन्ही योजनांमुळे ‘लाल परी’तून प्रवास करणा-यांच्या संख्येतही वाढ झाली.
महिला सन्मान योजनेंतर्गत तब्बल चार कोटी महिलांनी प्रवास केला, तर ७५ वर्षांपुढील एक कोटी ज्येष्ठ नागरिकांनी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत एसटीच्या मोफत प्रवासाचा लाभ घेतला. या योजना सुरू झाल्यापासून गेल्या अडीच वर्षांत एकूण १३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून, पुणे विभागाला ९३८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. पुणे महामंडळाचे १४ आगार आहेत. त्यांपैकी प्रामुख्याने शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून मुंबई, नागपूर, ठाणे, अकोला, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये जाणा-या एसटी बसची संख्या जास्त आहे.
२०२२-२३ या वर्षात धावल्या ३२९ बसेस
२०२२-२३ या वर्षात ३२९ ‘लाल परी’ रस्त्यावर धावल्या. यातून २ कोटी १२ लाख ९६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या काळात केवळ ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ सुरू होती. शिवाय, करोना प्रादुर्भावामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरणदेखील होते. तसेच, कर्मचा-यांनी दोन-अडीच महिने संप पुकारल्यानेही उत्पन्नावर परिणाम झाला.
‘महिला सन्मान’ची भर
सन २०२३-२४ या वर्षाच्या सुरुवातीलाच महिला सन्मान योजनेची भर पडल्याने एसटीच्या ६३२ फे-या झाल्या, तर चालू वर्षात सात महिन्यांत ३२९ बस १४ आगरांतून सोडण्यात आल्या, अशी माहिती पुणे एसटी विभागाच्या सहायक वाहतूक अधीक्षक ए. एम. शेख यांनी दिली.
सवलत आणि उत्पन्नवाढ
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या योजनांत मिळणा-या सवलतींमुळे प्रवासी संख्या वाढत असली, तरी तिकिटांतील फरक महामंडळाला अन्य स्रोतांतून भरून काढावा लागतो. राज्य शासन सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती करते. गेल्या अडीच वर्षांत महामंडळाला प्रवासी भाड्यातून एकूण ७३१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, तर २०७ कोटी रुपयांची प्रतिपूर्ती राज्य शासनाने केली.