एप्रिल ते जून हे तीन महिने मोठे जड जाणार आहेत. राजकीय नेत्यांना निवडणूक ज्वराचा तर सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा तडाखा बसणार आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला. देशात आतापासूनच उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. एल-निनोचे वर्ष असल्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाळा जाणवत होता. या महिन्यात देशाचे कमाल तापमान सरासरी ३४ ते ३८ अंश सेल्सिअस राहिले. आता एप्रिल आणि मे महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला मात्र उष्णता फारशी छळणार नाही.
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याला वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका बसतो. एप्रिल महिना सुरू झाला नाही तोच मराठवाड्याने ‘चाळीशी’ ओलांडली. एक एप्रिलला मालेगावचा पारा ४२ अंश होता. सोलापूर, धाराशिव, परभणी, बीड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक होते. मध्य महाराष्ट्र ३९ अंशावर होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी तीन महिन्यांत देशातील ८५ टक्के भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येतील. २०२३ मध्ये हा आकडा ६० टक्के होता. पुढील आठवड्यात तापमान ३ ते ५ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात सर्वाधिक परिणाम जाणवेल. ही स्थिती जूनपर्यंत राहू शकते. या काळात उष्णतेची लाट लागोपाठ २० दिवस राहू शकते. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक पक्ष यशासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्या दोन टप्प्यांचा प्रचार सुरू झाला आहे.
राज्यात मार्च महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला. निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर जसजसा वाढेल तसतसा उन्हाचा पाराही वाढत जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात औराद शहाजानी परिसरात थंडीच्या दिवसात उच्चांकी गारठ्याची नोंद होते आणि उन्हाळ्यात उच्चांकी तापमानाची नोंद होते. यंदाही प्रथमच औराद शहाजानी परिसरात ४२ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील नागरिक उष्णतेने हैराण झाले असून भर दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. राज्यात उष्माघाताचा पहिला बळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नोंदला गेला. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये उष्माघातामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. राज्यात गत चार-पाच दिवसांत काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे त्या भागातील हवामान तात्पुरते खालावले असले तरी पाऊस पडून गेल्यावर उकाडाही वाढला. काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. सकाळी थंड हवा आणि दुपारी कडक ऊन असे संमिश्र वातावरण निर्माण होत आहे. या विपरीत वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विषाणूजन्य ज्वरासह सर्दी-खोकल्याची साथ सुरू झाली आहे. वातावरणाचा परिणाम हंगामी पिकांवरही होत आहे.
गतवर्षी कमी पाऊसमानामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले होते तसेच रबी, उन्हाळी हंगामाचे नियोजनही बिघडले आहे. कमी पाऊसमानामुळे राज्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. बहुतांश नद्या-नाले, धरणे-तलाव कोरडे पडले आहेत. आता उन्हाचा चटका जसजसा वाढेल तसतशी पाण्याची मागणीही वाढेल. सध्या काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संभाव्य भीषण पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करायला हवी. पण सरकारकडे या भीषणतेकडे लक्ष देण्यास वेळ कुठे आहे! सध्या ते निवडणुकीच्या धामधुमीत, जागावाटपात गुंतले आहेत. ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरी भागातही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गत काही वर्षांपासून शेतीकडे दुर्लक्ष करून औद्योगिक क्षेत्राला पाणी कमी पडणार नाही असे धोरण अवलंबण्यात आले आहे, जे योग्य नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असताना उन्हाळी हंगामी पिकांसह फळे-फुले- भाजीपाला यासाठीही पाण्याची गरज वाढत जाणार आहे. दुष्काळात शेतीनंतर फटका बसतो तो पशुधनाला! त्यांच्यासाठी आगामी चार-पाच महिन्यांत चा-याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे.
मागणीनुसार चारा डेपो, चारा छावण्या तयार ठेवाव्या लागणार आहेत. पावसाचे प्रमाण अनियमित होत असल्यामुळे कोरडवाहू शेतीला पेरणीच्या वेळात बदल करावा लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. जागतिक हवामान विभागाने जगाला धोक्याचा इशारा दिला आहे. या विभागाने आपल्या अहवालात २०२३ हे वर्ष आतापर्यंतचे विक्रमी उष्ण वर्ष ठरल्याचे म्हटले आहे. या वर्षात जागतिक तापमान दीड टक्क्याने वाढले. तापमानवाढीमुळे दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले. त्यामुळे जीवनमानावर परिणाम तर झालाच शिवाय शेती आणि इतर संपत्तीचेही नुकसान झाल्याने आर्थिक हानी झाली. वातावरण बदलामुळे मान्सूनवर परिणाम झाला. तापमानवाढीपेक्षा वातावरणातील बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटा, पुराच्या घटना, दुष्काळी स्थिती, जंगलात वणवे लागणे तसेच तीव्र स्वरूपाची चक्रीवादळे यामुळे जग हैराण झाले. या घटना २०२३ मध्ये अधिक जाणवल्या. त्यामुळे मानवी जीवन विस्कळीत झाले, आर्थिक हानी वाढली. तापमानवाढीमुळे शेतीही खूप आव्हानात्मक बनली आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्वच देशांत शेती आणि शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.