लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी २०२३ मध्ये जाहिरात दिलेल्या ७०३४ लिपिक टंकलेखक आणि ४३८ कर सहाय्यक पदांसाठीची अंतिम गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर केल्याने आता लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक पदांसाठीच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपरोक्त दोन्ही पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या कौशल्य चाचणीस २७५ पेक्षा अधिक परीक्षार्थीनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकारण औरंगाबाद येथे आव्हान देण्यात आले होते. त्यासंबंधीची सुनावणी पुर्ण झालेली होती. त्या विषयीचे न्यायाधिकरणाकडून अंतीम आदेश मंगळवारी आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर केली. या प्रकरणात प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर एकुण ११ वेळेस सदरील प्रकरणाची सुनावणी होऊन अंतीम आदेश मंगळवार दि. ११ फेबु्रवारी रोजी पारीत झाला.
याचिकाकर्त्यांचे असे म्हणणे होते की, त्यांना डीफेक्टीव्ह की बोर्ड देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या गुणवत्ता कौशल्यावर परिणाम झाला. परंतु, प्रशासकीय न्यायाधिकरणाने त्यांचे म्हणणे खोडून टाकले व त्यांच्या याचिका रद्द केल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे, असे प्रतिपादन करण्यात आले की, याचिकाकर्त्याबरोबर इतर परीक्षार्थींनी परीक्षा दिलेल्या होत्या. तेच की-बोर्ड वापरले होते. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यातमध्ये काहींही तथ्य नाही, असे न्यायधिकारणाच्या निदर्शनास आणुन दिले.
सदरील प्रकरणात प्रशासकीय न्यायाधीकरणासमोर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या निवाड्यासंदर्भात पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकुन प्रशासकीय न्यायाधिकरणाने सर्व याचिका खारिज केल्या. सर्व सात याचिकांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अॅड. बालाजी येणगे यांनी युक्तीवाद केला व याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अमोल चालक, अॅड. प्रतिक भोसले, अॅड. पी. एम. कांबळे यांनी काम पाहिले.