लातूर : प्रतिनिधी
लेक लाडकी योजनेला पालकांचा अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागण्यापूर्वी योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील ६९३ मुलींना लाभ मिळाला. योजनेची वाढती लोकप्रियता पाहता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे १ हजार १४३ प्रस्ताव सादर झाले आहेत. या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी आचार संहिता शिथील होण्याची अथवा संपण्याची वाट पहावी लागणार आहे.
लातूर जिल्हयात मुलींच्या जन्मास प्रोतसाहन मिळावे, तिचा जन्मदर वाढवा, तिच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्युदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करण्याच्या बरोबरच मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने लेक लाडकी योजनेची अमंलबजावणी सुरू केली आहे. तसेच या योजनच्या निकषातही बदल केले आहेत.
लातूर जि. प. च्या महिला बालकल्याण विभागास सचिव व आयुक्त यांनी मार्च अखेर पर्यत ५ हजार १४५ मुलींना लाभ देण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुषंगाने मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आचार संहिता लागेपर्यंत किमान १ हजार मुलींना लाभ देण्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाभरातून त्या-त्या तालुक्यातील लाभार्थ्यांचे अर्ज तालुक्याच्या सीडीपीओ कार्यालयात ८०६ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांच्या छानणीत कांही अर्जात त्रूटी निघाल्या. कागदपत्रांची परीपूर्ती झालेले ७०८ जणांचे प्रस्ताव मंजूर करून पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आले. दि. १ मार्च ते आचार संहिता लागेपर्यत ६९३ मुलींना लेक लाडकी योजनेचा लाभ दिला असून आई व मुलींच्या संयुक्त खात्यावर ३४ लाख ६५ हजार रूपये वर्ग झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात या योजनेचा लाभ घेणा-यांची संख्या वाढणार आहे.