मुंबई – अभिनेत्री नयनताराला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘लेडी सुपरस्टार’ या नावाने ओळखले जाते. परंतु ही बिरुदावली तिच्या नावापुढे न लावण्याची विनंती तिने चाहत्यांना केली आहे. नयनतारा या नावानेच तिला ओळखलं जावं, अशी इच्छा तिने एका निवेदनात व्यक्त केली आहे.
साऊथचे मोठे स्टार असलेल्या कमल हासन यांना ‘उलगनायगन’ (युनिव्हर्सल हिरो) या नावाने त्यांचे चाहते संबोधतात, तसेच अजित यांनाही ‘कधल मन्नन’ (प्रेमाचा राजा) या नावाने आदरासह बोलवतात. यापूर्वी कमल आणि अजित यांनी आपल्या चाहत्यांना या बिरुदावली न लावण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांच्यानंतर नयनतारानेही आपल्या चाहत्यांना तशीच विनंती केली आहे. यासाठी तिने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनात, नयनतारान्े तिला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे, परंतु ती फक्त नयनतारा म्हणून ओळखली जावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे. ती म्हणते, ‘माझं आयुष्य हे एक उघड्या पुस्तकासारखं आहे जे नेहमीच तुमच्या बिनशर्त प्रेम आणि आपुलकीनं सजलेलं आहे. माझ्या यशादरम्यान माझ्या खांद्यावरची थाप असो किंवा अडचणींमध्ये मला आधार देण्यासाठी तुमचा हात पुढे करणं असो, तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिला आहात.’
‘लेडी सुपरस्टार’ ही लोकांनी दिलेली पदवी तिला महत्त्वाची वाटत असली तरी तिचे नाव तिला जास्त प्रिय असल्याचे नयनताराने म्हटले आहे. ‘मला वाटतं की, नयनतारा हे नाव माझ्या हृदयाच्या सर्वाधिक जवळचं आहे. मी एक अभिनेत्री नाही तर व्यक्तीही आहे हे यातून दर्शवतं,’ असे तिने पुढे लिहिले आहे.