नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पेजर आणि हवाई हल्ले करून इस्रायलने लेबनॉनमध्ये हाहाकार उडवून दिलेला असताना मंगळवारी रात्री लेबनॉनच्या हद्दीमध्ये सैन्य घुसविले आहे. इस्रायली सैन्याचे हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये रणगाडे, रॉकेट लाँचर घेऊन घुसले आहेत. आयडीएफने मंगळवारी पहाटे याची माहिती जगाला दिली, यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.
ग्राउंड स्ट्राइक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाचा नायनाट कसा करणे आवश्यक आहे यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
इस्त्रायलच्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडाली असून अनेक देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. या युद्धामुळे भारतानेही आपल्या नागरिकांना लेबनॉनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.
लेबनॉनमध्ये ४००० हून अधिक भारतीय आहेत आणि केंद्र सरकारने सर्वांना लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. बैरूतमधील लेबनॉनमध्ये राहणारे भारतीय नागरिक बांधकाम क्षेत्र, कृषी, फार्मा इत्यादींमध्ये काम करतात.
भारतीय दुतावासाने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, १९७५ ते १९९० च्या गृहयुद्धादरम्यान भारताने इतर देशांच्या दूतावासांप्रमाणे बैरूतमधील आपला दूतावास खुला ठेवला आहे. भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना युद्धाच्या काळात या भागात न जाण्याचे तसेच केंद्र सरकारने लेबनॉनमधील सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.