मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत विविध पक्षांकडून डॉक्टरची पदवी असलेले तब्बल १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यातील व्यवसायाने डॉक्टर असलेले ६ उमेदवार विजयी झाले असून ६ उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
राज्यातील नवनिर्वाचित ४८ खासदारांमध्ये डॉक्टर खासदारांचा बोलबाला राहिला आहे. विजयी झालेल्या सहा खासदारांमध्ये डॉ. शोभा बच्छाव (धुळे), डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा-गोंदिया), डॉ. कल्याण काळे (जालना) व शिवाजी काळगे (लातूर) हे चार खासदार काँग्रेसचे आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण) हे शिवसेनेचे तर डॉ. हेमंत सावरा (पालघर) हे भाजपचे आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्या डॉक्टर उमेदवारांपैकी डॉ. हीना गावित, डॉ. सुभाष भामरे, डॉ. अभय पाटील, डॉ. मोहन राईकवार, डॉ. भारती पवार, डॉ. सुजय विखे-पाटील या सहा डॉक्टरांच्या पदरात पराभव पडला आहे.
तसेच आडनाव साधर्म्य असलेले खासदार मात्र वेगवेगळ्या विरोधी पक्षांतील आहेत. यात प्रतापराव जाधव (बुलडाणा-शिवसेना, शिंदे), संजय जाधव (परभणी – शिवसेना, उबाठा), अमर काळे (वर्धा- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), कल्याण काळे (जालना – काँग्रेस), श्रीकांत शिंदे ( कल्याण – शिवसेना, शिंदे), प्रणिती शिंदे (सोलापूर – काँग्रेस), संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई – शिवसेना, उबाठा), विशाल पाटील (सांगली – अपक्ष), उदयनराजे भोसले (सातारा – भाजप) व श्रीमंत शाहू महाराज भोसले (कोल्हापूर – काँग्रेस) हे दोन राजघराण्यातील उमेदवार विजयी झाले आहेत.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीत वकील उमेदवार विजयी होण्याचे प्रमाण जास्त होते. यंदा मात्र फक्त एकच वकील उमेदवार महाराष्ट्रातून केंद्रात गेला आहे. राज्यात अॅड. गोवाल पाडवी (नंदुरबार – काँग्रेस) हे एकमेव वकील विजयी झाले आहेत. तर सुप्रसिद्ध वकील अॅड. उज्ज्वल निकम (उत्तर मध्य मुंबई), वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (अकोला) व अॅड. सुनील गोंदण (उत्तर मुंबई) या तीन प्रमुख वकील उमेदवारांचा पराभव झाला आहे.