माणगाव : लग्नाला निघालेल्या व-हाडाच्या बसवर काळाने झडप घातली. पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात कोंडेथर गावच्या हद्दीत बस उलटून भयंकर अपघात घडल्याची घटना शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून बिरवाडीकडे लग्नासाठी निघालेली खासगी बस (एमएच १४ जीयू ३४०५) पुण्याहून माणगांवकडे येत होती. बस ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणण्यात आले आहे.
मृतांमध्ये ३ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे असून, एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.