22.9 C
Latur
Monday, December 30, 2024
Homeमहाराष्ट्रवडीगोद्रीत मराठा-ओबीसी आंदोलक आमने-सामने

वडीगोद्रीत मराठा-ओबीसी आंदोलक आमने-सामने

वडीगोद्री : जालन्यातील वडीगोद्री येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांना शांत करताना पोलिसांची दमछाक झाली.

लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. तर मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषण करत आहेत. तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. दोन्ही समाजाचे कार्यकर्ते जमले, त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. वडीगोद्रीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेट लागू करावे, सगेसोयरे संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, आदी मागण्यांसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
अंतरवालीला जाताना मध्येच वडीगोद्री लागते. तिथेच रस्त्याच्या कडेला लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे वडीगोद्रीतून मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या गाड्या जातात. तेव्हा, ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते आमने-सामने आल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास पुन्हा ओबीसी आणि मराठा कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, पोलिसांची मोठी दमछाक उडाल्याचे पाहायला मिळाले.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलेले नाही. मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे गावक-यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगेंनी ऐकून घेतले नाही.
मराठा आंदोलक आणि शंभुराज देसाई यांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी रात्री सलाईनद्वारे उपचार घेतले, त्यावर भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. शंभुराज देसाईंची जरांगेंसोबत संवादाची माहिती सोमवारी देणार आहेत.

लक्ष्मण हाकेंसह तिघांचे उपोषण सुरू
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी ओबीसी समाजासाठी आंदोलन सुरू केले आहे. तसेच त्यांच्याबरोबर वकील मंगेश ससाणे हेदेखील उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षण हे ओबीसीतून दिले जाऊ नये अशी मागणी या तिघांनीही केली आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजाचे आंदोलक हे अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत.

जे काय करायचे ते शांततेने करा
छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
लोकांना अहिंसक आंदोलन, सत्याग्रह, अन्नत्याग आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आपण त्यांना ना करू शकत नाही. त्यातून उद्रेक होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. जे प्रश्न आहेत ते बसून सोडवावे लागतात. ज्या वेळेला प्रश्न सोडवले जातात तेव्हा प्रथा, परंपरा, कायदा काय आहे, कोर्टाचे नियम काय आहेत, काय दिलंय, काय मागणी आहे यावर विचार करूनच पुढे जाता येईल. एकदम असे अटीतटीवर येऊन चालणार नाही, असा टोला त्यांनी आंदोलनकर्त्यांना लगावला. जे काय करायचं ते शांततेने करा. कायदा-सुव्यवस्थेचा, शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR