वलांडी : हसन मोमिन
देवणी तालुक्यातील वलांडी येथे नाफेड च्या वतीने एका केंद्रावर सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. या केंद्रांची १२ जानेवारी रोजी संपणारी मुदत आता ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला गती देण्यात येत असून, या केंद्रांवर वाहनांच्या रांगा पहायला मिळत आहेत.
शासनाने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजार समित्यांच्या मोंढ्यात सरासरी चार हजार रुपयांवरही सोयाबीन जात नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांकडे वळला आहे. मागील दोन ते तीन वर्षाच्या तुलनेत यंदा नाफेडच्या या केंद्रांवर सोयाबीनची खरेदी विक्रमी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
आत्तापर्यंत जवळपास या एका केंद्रावर १११००० क्विंटलहूनअधिक सोयाबीन खरेदी करण्यात आल्याची माहिती अंशिका अॅग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक गजानन लांडगे यांनी दिली आहे. परंतु सध्या बारदाण्याचा प्रश्न केंद्रचालकांसह शेतक-यांनाही सतावत आहे. यासंदर्भात पणन विभागाकडे पाठपुरावा करूनही बारदाणा वेळेत उपलब्ध होत नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. या केंद्रावर एकूण २९०४ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत ६०० शेतक-यांची खरेदी झाली आहे. १७०० शेतक-यांना मॅसेज आले आहेत तर
विक्रीच्या प्रतीक्षेत १३०० शेतकरी आहेत.