23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeसंपादकीयवाचाळवीरांना वेळीच रोखा!

वाचाळवीरांना वेळीच रोखा!

सध्या महाराष्ट्रात वाचाळवीरांचे अमाप पीक माजले आहे. ही पैदास वेळीच ठेचली गेली नाही तर राज्यात अराजक माजेल. आजकाल कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि महापुरुषांबाबत अर्वाच्य बोलतो. आपल्या विधानामुळे काय रण माजेल याची त्याला तमा नसते किंबहुना रण माजावे अशीच त्याची इच्छा असते. मग ते राहुल सोलापूरकर असोत, प्रशांत कोरटकर असोत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असोत, एमआयएमचे नेते ओवेसी असोत वा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी असोत. या सा-या विषवल्ली आहेत. त्यांना वेळीच ठेचायला हवे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस आहे तेथे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे वंदनीय आणि आदरणीय आहेत. पण कोणी तरी येतो आणि त्यांच्याबद्दल काहीतरी बरळून जातो. त्यामुळे विनाकारण समाजात दुहीची आणि द्वेषाची निर्मिती केली जाते. महापुरुषांची विटंबना असो अथवा महापुरुषांबाबत केलेली आक्षेपार्ह विधाने असोत त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या दंगलीसुद्धा झाल्या आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडण्यास मदतच झाली.

गत काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांनी जी काही विधाने केली ती करण्याची काहीच गरज नव्हती पण बोलण्याच्या भरात ते भरकटत गेले आणि आपण महापुरुषांचा अवमान करत आहोत याचे त्यांना भानच राहिले नाही. मुळात गत काही वर्षांत सर्वच महापुरुष आपापल्या जातीमध्ये दुर्दैवाने विभागले गेले आहेत. इतर जातीतील लोकांना या आपल्या महापुरुषांबद्दल आदर वाटत नाही अशा प्रकारची भावना निर्माण होत आहे अथवा जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्नही होत आहे. काही दिवसांपूर्वी अशा वाचाळवीरांमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी सामील झाले. त्यांनी मुघल बादशहा औरंगजेब हा सर्वोत्कृष्ट प्रशासक होता आणि त्याच्या कारकीर्दीमध्ये सारे काही आलबेल होते अशा प्रकारचे विधान केले. औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न त्यांना चांगलाच भोवला आहे. आझमी यांनी दोन दिवसांपूर्वी विधान भवन परिसरात माध्यमांसमोर बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. तो क्रूर शासक नव्हता असे गौरवोद्गार काढल्यानंतर राज्यभरातून आझमी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले.

बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी आवाजी मतदानाने आझमी यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन प्रस्तावावर बोलताना भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी मविआच्या काळात भाजपच्या एका विधान परिषद सदस्याने सैनिकांविषयी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत, त्यावेळी जशी कारवाई करण्यात आली होती, त्याच पद्धतीने आझमींचे केवळ अधिवेशन काळापुरते निलंबन न करता पाच वर्षांसाठी सदस्यत्व रद्द करावे, त्यांचे सर्व भत्ते, आमदार निधी व पगारही बंद करण्यासाठी प्रस्तावात सुधारणा करण्याची आग्रहाची मागणी केली होती. छत्रपतींचा अवमान करणा-यांना सोडणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. छत्रपतींचा अवमान करणा-यांना शंभर टक्के जेलमध्ये टाकू असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामीन मिळवला आहे पण त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, कोरटकर वगैरे चिल्लर माणसे आहेत, जितेंद्र आव्हाड काय बोलले त्याचा विरोधकांनी निषेध केला नाही. औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते.

औरंगजेब किती बलाढ्य होता आणि शिवाजी महाराज पाच फुटांचे होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ मधून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. आपल्यावरील निलंबनाची कारवाई अन्याय करणारी आहे असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. माझे निलंबन हा केवळ माझ्यावरच नव्हे तर मी ज्या लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्यावरही अन्याय आहे असे ते म्हणाले. सध्या ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो आदरभाव वृद्धिंगत झाला आहे, त्याला धक्का देणारे वक्तव्य अबू आझमींनी केले आहे. संभाजी राजांवर अत्यंत कू्रर पद्धतीने अत्याचार करणा-या औरंगजेबाचे कोडकौतुक करणारे नेते महाराष्ट्रात आहेत ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट म्हणावी लागेल. या आधीसुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते ओवेसी यांनी सभेमध्ये औरंगजेबाचे अशाच प्रकारे गुणगान केले होते. ज्या महापुरुषांबद्दल सा-यांच्या मनात आदरभाव आहे त्या महापुरुषांना गंभीर दुखापत करणारे औरंगजेबासारखे क्रूर बादशहा आदर्श कसे असू शकतात? महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधाने करणा-यांना योग्य शिक्षा देण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे.

विनाकारण एखाद्या समाजाबद्दल अविश्वासाची भावना निर्माण केली जात असेल तर त्यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. कोणीतरी एकाने केलेल्या चुकीच्या विधानाचा फटका संपूर्ण समाजाला बसण्याचा धोकाही लक्षात घ्यायला हवा. असे विषय पेटणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. सामाजिक वातावरण बिघडवणा-यांवर, वाचाळवीरांवर कडक कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह विधानामुळे त्या महापुरुषांचा अवमान तर होतोच शिवाय विनाकारण सामाजिक वातावरण बिघडते आणि अविश्वासाची भावना निर्माण होते हे अधिक गंभीर आहे. चांगला प्रशासक होण्यासाठी खूप चांगली कामे करावी लागतात पण क्रूर कामे करणारा कधीच चांगला प्रशासक होऊ शकत नाही. अबू आझमींना चांगल्या प्रशासकाबद्दलचे आपले मत बदलावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR