28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
HomeUncategorizedवारक-यांच्या वाहनांना मिळाली टोलमाफी

वारक-यांच्या वाहनांना मिळाली टोलमाफी

मुंबई : प्रतिनिधी
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, प्रत्येक पिढीनिशी त्यांची परंपरा चालत आली आहे. विठुरायाला पाहण्यासाठी पंढरीत भक्तांची झुंबड उडते. आता विठुरायांच्या भेटीसाठी पुन्हा वारक-यांची पावले पंढरीच्या दिशेने चालू लागली आहेत. यंदाचा पालखी सोहळा विठुरायांच्या भेटीसाठी दिमाखात निघाला आहे. यंदा वारक-यांसाठी सरकारसुद्धा घोषणांचा पाऊस पाडत आहे. अनेक भाविक आपल्या खासगी वाहनांनी विठुरायांची पंढरी गाठत असतात. अशा भाविकांना राज्य शासनाने टोलमाफी जाहीर केली. वारक-यांची वाहने आणि पालख्यांना आजपासून टोलमाफी करण्यात आली.

पंढरीच्या वारीच्या निमित्ताने यंदा राज्य शासनाने वारीत सामिल झालेल्या नोंदणीकृत दिंडीला २० हजार रुपये देण्याची घोषणा केली. तसेच वारीदरम्यान, आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध पथके नेमली. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही विशेष काळजी घेतली जात आहे. आता पंढरीला जाणा-या वारक-यांना आर्थिक भुर्दंड बसू नये, म्हणून राज्य शासनाने टोलमाफीचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने विठुरायाच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांना दिलासा मिळाला आहे.

येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा उत्सव आहे. मागील वर्षीसुद्धा राज्य सरकारने आषाढी एकादशीला जाणा-या खासगी वाहनांवरील टोल माफ केला होता आणि सरकारच्या नियोजनाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भाविकही खासगी वाहनाने हजर झाले होते. हाच निर्णय लागू करत यावर्षीही खासगी वाहने बस, टेम्पो, चारचाकी यांच्यावरील टोल माफ केला आहे. आजपासून पंढरपुराकडे जाणा-या वाहनांना आता टोल भरावा लागणार नाही.

२१ जुलैपर्यंत सूट
१७ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा ओघ जास्त असणार आहे. त्यानंतर तेथून निघायला आणि आपापल्या गावी परतायला चार-पाच दिवसांचा कालावधी लागतो, हे लक्षात घेऊन राज्य शासनाने ३ जुलै ते २१ जुलैदरम्यान टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २१ जुलैपर्यंत भाविकांना कोणताही टोल भरावा लागणार नाही. त्यामुळे वारक-यांचा खिशावरील अतिरिक्त भार कमी होणार आहे.

परिवहनकडून विशेष स्टीकर
पंढरीला जाणा-या वारक-यांचा वाहनांना परिवहन विभागातून विशेष स्टीकर देण्यात येणार आहेत. फक्त वारीनिमित्त निघालेल्या वाहनांनाच ही सवलत मिळणार आहे तर पंढरपूरहून निघणा-या सर्व वाहनांना सवलत लागू असेल. गरज असल्यास घाटातील अवजड वाहनांची ये-जा बंद करा, अशा सूचनाही स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्­यांनी दिल्या. विशेष म्हणजे पंढरीला जाणा-या एसटी बसलाही टोलनाक्यावरील कर माफ करण्यात आला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR