पुणे – पुण्याजवळील दौंड परिसरात पंढरपूरसाठी निघालेल्या वारक-यांना कोयत्याच्या धाकाने लुबाडल्याची घटना घडली होती. इतकेच नाही तर वारक-यांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारही करण्यात आले. याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपींना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची दहा वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. तर आज दौंड लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, पुणे ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगार, संशयित गुन्हेगार यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही आरोपींचे स्केच तयार केले आहेत. आणि त्या आधारे तपास सुरू आहे. वारक-याची लूट आणि अतिप्रसंग प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र (स्केच) पुणे ग्रामीण पोलिसांकडून जारी करण्यात आले होते.
वारक-यांचा एक टेम्पो सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंडजवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारक-यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.
त्यांच्यासोबत असणा-या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. इतकेच नाही तर याच वारक-यांसोबत असणा-या एका अल्पवयीन तरुणीला चहाच्या टपरीमागे घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पंढरपूरच्या वारी दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.