18.1 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeसंपादकीयवाल्मिक कराडचे शरणनाट्य!

वाल्मिक कराडचे शरणनाट्य!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा संशय असलेला आणि दीडशे पोलिसांना गेले २२ दिवस गुंगारा देणारा वाल्मिक कराड अखेर ३१ डिसेंबर रोजी सीआयडी(राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) पोलिसांना शरण आला. सीआयडी कार्यालयातच त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर त्याला केजला पाठवण्यात आले. रात्री उशिरा त्याला केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर वाल्मिक कराडला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुणे सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडने एक व्हीडीओ जारी केला होता. त्यात तो म्हणतो, केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.

राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडलं जात आहे. पुढील तपासात मी दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. इतिहासात वाल्या कोळी नामक दरोडेखोराने अनेक गुन्हे केले होेते, अखेर त्याला साक्षात्कार झाला आणि वाल्याचा वाल्मिक बनला. वर्तमानातील प्रकरणात ‘तो’ आधीच ‘वाल्मिक’ आहे, त्याचा ‘वाल्या कोळी’ होऊ नये म्हणजे झाले! वर्तमानातील प्रकरण काळा इतिहास जागवते की काय अशी शंका घेण्यास जागा आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होत होती. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. या गंभीर हत्या प्रकरणात राज्यमंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावक-यांना शंका असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली होती.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. एका सरपंचाला उचलून नेलं जातं आणि त्याचा खून केला जातो. वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. ज्या नेत्याचे पाठबळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचे बोलले जात आहे, त्या नेत्याला मंत्रिपद देण्यात आलेले आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीडमधील छोट्या पोरांनाही माहीत आहे. वाल्मिक कराडने कोणालाही उचलावं, मारावं आणि त्याचा मृतदेह गायब करावा असा आजपर्यंत बीडचा इतिहास आहे. मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलही घेतली जात नाही. चौकशी करणारे पोलिस आरोपींबरोबर चहापान करताना दिसतात, हे संस्कारक्षम राज्याची मानहानी करणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हटले होते. वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्या असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले होते.

दरम्यान वाल्मिक कराड यांची पत्नी आणि त्यांच्या संपर्कातील काही जणांची सीआयडी चौकशी करण्यात आली आणि काहींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली. वाल्मिक कराड हे मूळचे परळी तालुक्यातील पांगरी गावचे. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ते परळीत आले. उपजीविकेसाठी त्यांनी जत्रेत सिनेमे दाखवण्याचे काम केले. नंतर ते गोपीनाथ मुंडेंच्या घरात घरगडी म्हणून काम करू लागले. पुढे गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेसोबत गेले. परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता, नाथ प्रतिष्ठानचे सदस्य, बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य राहिलेले वाल्मिक कराड दशकभरापासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या पोलिस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीशी संबंधित गुन्हा दाखल आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडी पोलिसांना शरण गेले हे कसे? असा सवाल केला जात आहे. राज्यातील पोलिस दल व सीआयडी विभाग सक्षम असेल तर सुमारे तीन आठवडे वाल्मिक कराड सापडले कसे नाहीत? खरे पाहता पोलिस आणि सीआयडी विभाग आपल्या कामात तरबेज आहेत परंतु त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याने त्यांचे मनोबल कमजोर झाले आहे.

आरोपी शरण येतो मात्र पोलिस त्याला पकडू शकत नाहीत ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा झालेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत. फडणवीस यांच्या नागपूरमध्ये ७ दिवसांत ७ खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी आपली पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही. बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत आणि बीडमधील गुन्हेगारीला ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ असे संबोधत आहेत. वाल्मिक कराड यांच्या मालमत्ता लवकरात लवकर जप्त झाल्या पाहिजेत त्याशिवाय त्यांचे अन्य गुन्हे उघड होणार नाहीत. त्यांची बँक खाती सील करण्यात आली परंतु त्यालाही उशीर झाल्याने त्यात काहीच शिल्लक नसेल. अनेक गुन्हे करूनही वाल्या कोळ्याला ‘वाल्मिक’ बनण्यात यश आले. आधीच ‘वाल्मिक’ असलेल्यांनी ‘वाल्या कोळी’ बनू नये.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR