लातूर : प्रतिनिधी
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारवाई करीत वाहनासह ११ लाख ३६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त केली. या प्रकरणी दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम राबवित येत आहे. दि. २४ जानेवारी रोजी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन पोलिसांनी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रिंगरोड वरुन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला ८ लाख ३६ हजार ४०० रुपयाचा विमल नावाचा गुटखा, सुगंधित तंबाखू , ३ लाख रुपयाचे एक पिकअप वाहन, असा एकूण ११ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणारे सुनील भारतलाल राठी, वय ३४ वर्ष, राहणार सुपारी हनुमान जवळ, मोती नगर, लातूर व ज्ञानेश्वर भास्कर रावते, वय ३० वर्ष, राहणार करजगाव तालुका औसा जिल्हा लातूर यांना ताब्यात घेतले. यांच्याविरुद्ध पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलीस ठाणे गांधीचौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपींना न्यायलासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात, पोलीस ठाणे गांधीचौकचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंडित भंडारे, पोलीस अमलदार दयानंद आरदवाड, दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे.