मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकूराबद्दल मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता सायबर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर न हटवल्याबद्दल विकीपिडियाच्या संपादकांवर गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिका-यांनी शुक्रवारी याबद्दल माहिती दिली. नोडल एजन्सीने कॅलिफोर्नियामधून चालणा-या ‘विकिमीडिया फाउंडेशन’ला नोटीस पाठवली आणि विकिपीडियावरून मजकूर हटवण्याची विनंती केली होती.
राज्यातील सायबर एजन्सीने नोटीसमध्ये असे नमूद केले होते की, विकीपीडियावरील मजकूर चुकीचा आहे आणि त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज हे भारतात पूजनीय आहेत. विकिपीडियावर पोस्ट केलेल्या माहितीमुळे त्यांच्या अनुयायांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो.