नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगची तपासणी केली असता, मोठे वन्यजीव तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. विमानतळावर कस्टम विभागाने बेकायदेशीर विदेशी वन्यजीव आणणा-या तीन भारतीयांना अटक केली आहे.
हे तिघे प्रवासी एअर इंडियाच्या विमान एआय ३०३ ने बँकॉकहून दिल्लीला आले. यादरम्यान, त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या बॅगेत विविध प्रजातींचे वन्य प्राणी आढळले. कस्टम विभागाने जप्त केलेल्या वन्यजीवांमध्ये विविध प्रजातींचे अनेक साप होते. यापैकी ५ कॉर्न साप, ८ मिल्क साप, आणि ९ बॉल पायथॉन साप आहेत. याशिवाय, अनेक वेगवेगळ्या प्रजातींचे सरडे देखील जप्त करण्यात आले.
या सरड्यांमध्ये ४ बियर्डेड ड्रॅगन, ७ क्रेस्टेड गेको, ११ कॅमेरून ड्वार्फ गेको आणि एक गेको यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, इतर अनेक वन्यजीव प्रजाती देखील सापडल्या आहेत. यापैकी त्यांच्याकडून १४ कीटक आणि एक कोळीही जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे मोठी कारवाई करून विमानतळावर परदेशी वन्यजीवांची तस्करी कस्टम विभागाने उधळून लावली आहे.