27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरविद्यमान सरकारला विधानसभेत मतदान न करण्याची घेतली शपथ 

विद्यमान सरकारला विधानसभेत मतदान न करण्याची घेतली शपथ 

लातूर : प्रतिनिधी
हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारुन मराठा समाजाला कुणबी मराठा प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी उमरगा तालुक्यातील कवठा येथे कवठा ग्रामस्थांच्या वतीने गांव बंद अंदोलन करुन विद्यमान सरकारला येणा-या विधानसभेत मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली. मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपुर्वक रजाकारातील कासिम रजवीप्रमाणे मराठा समाजाचा आरक्षणाकरीता छळ करीत असल्याचा आरोप उपोषणकर्ते विनायकराव पाटील यांनी यावेळी केला. कवठा येथे समाजसेवक विनायकराव पाटील हे १७ सप्टेंबरपासून हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारुन मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषण करित आहेत. त्यांच्या उपोषणाचा शनिवारी पाचवा दिवस आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पाटील यांनी अन्नपाणी त्याग उपोषण सुरु केल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कवठा ग्रामस्थांनी गांव बंद अंदोलन करुन विद्यमान सरकारला सत्तेतून पायउतार करण्याची शपथ घेतली. ग्रामस्थांच्या वतीने येथील विष्णू मंदिरापासून भव्य आरक्षण रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत गावांतील ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी महिला मुलींची मोठया संख्येनि उपस्थिती होती. रॅलीचा समारोप उपोषणस्थळी झाला. यावेळी विजयकुमार सोनवणे, अतुल सोनवणे, विकास पाटील, मलंग गुरुजी यांची भाषणे झाली. यावेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की, आरक्षण देण्याच्या कारणावरुन सरकारकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. ३७१ कलमाप्रमाणे मराठवाडयातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद असतानाही आरक्षणापासून गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाज विविध आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून न्याय मागणी करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळे पर्यंत लढा सुरूच रहाणार आहे.
 आरक्षणा साठी देह त्याग करण्याचा निर्धार केल्याचे पाटील यांनी सांगितले. आता कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी शपथ  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची त्यांनी या वेळी घेतली. विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळाचे राजेंद्र सोनवणे, सतीश पवार, अलका माने, शोभा सोनवणे, मंगल माने यांनी अभंग गायनातून मराठा आरक्षणाची  मागणी केली. तानाजी सोनवणे, गणेश सोनवणे, भागवत सोनवणे, मलंग गुरुजी आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR