लातूर : प्रतिनिधी
महाविद्यालयीन तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती असते. तरुणाईला योग्य दिशा प्राप्त झाल्यास ते अनेक क्षेत्रात भव्य दिव्य अशी कामगिरी पार पाडू शकतात. उत्तम संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, प्रचंड मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि इंग्रजीवर प्रभुत्व या पंचसुत्रींचा वापर केल्यास आपण विविध क्षेत्रात उज्वल यश संपादित करू शकता] असे प्रतिपादन यशदा पुणेचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी केले.
महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर विचारपीठावर पर्यवेक्षिका प्रा. वनिता पाटील, लेखक विलास ढवळे, सामाजिक कार्यकर्ता जी. एन. साळवे, कैलास बनसोडे, समन्वयक प्रा. रवींद्र सोनोने, स्टाफ सेक्रेटरी प्रा. रवींद्र सुरवसे, स्पर्धा परीक्षा केंद्राच्या समन्वयिका डॉ. अश्विनी रोडे, सदस्य प्रा. कल्पना गिराम, प्रा. रूपाली हलवाई आणि प्रा. मनोज वैरागकर आदिची उपस्थिती होती.
अलीकडच्या काळात वाचन संस्कृती कमी झाली आसल्याची खंत व्यक्त करीत डॉ. जोगदंड म्हणाले की, ग्रंथ गप्प राहून आपल्याला बोलायला शिकवतात. ग्रंथ वाचनाने आपल्या ज्ञान आणि अनुभवाच्या कक्षा विस्तारत असतात असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गवई म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीतून आयुष्याला योग्य दिशा द्यावी. प्रवास, वाचन, ज्ञानीजनांची संगत यातून व्यक्तिमत्व समृद्ध होत असते.
आजचे जग आंतरविद्याशाखीय, बहुभाषिक संवाद आणि संभाषणाचे आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ज्ञान कक्षा विस्ताराव्यात असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र सुरवसे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अश्विनी रोडे यांनी केले तर आभार प्रा. शैलेश कानडे यांनी मानले.