30.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रविधीमंडळात अनावश्यक गर्दी; मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी

विधीमंडळात अनावश्यक गर्दी; मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी

मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात होणा-या गर्दीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच मधल्या दलालांबाबत काही तरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. मंत्रालयात अनावश्यक वाढत चाललेल्या गर्दीमुळे अनेकदा तक्रारीचा सूर उमटल्याचे म्हटले जात आहे. हीच बाब आता विधिमंडळातही निदर्शनास आल्याचे बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत सुरक्षारक्षकांना झापल्याचे समजते.

विधानभवनाला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. दलालांचे उच्चाटन करणार, असा संकल्प नवीन सरकारने केला, पण नजर टाकली की, एक-दोन दलाल तरी सहज दिसतात. त्यांना कोण पास देते माहिती नाही, पण मंत्रालय, विधानभवनात ऐटीत कसे मिरवायचे याची जुगाड टेक्नॉलॉजी त्यांना जमलेली आहे. सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात गर्दी होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तर रेटारेटी होती. अशी गर्दी करणारे हौशेगौशे इकडे येतातच कसे? असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानभवनच्या सुरक्षा अधिका-यांना झापले देखील. परिणामत: पासचे सर्रास वाटप आता बंद होणार आहे. ‘आपल्या’माणसांना बरोबर पासेस पुरविणारे विधानभवनातीलच काही लोक असू शकतात, त्यांना शोधले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, नाशिक रोडच्या आमदार सरोज अहिरे २०१९ ते २०२४ या काळातही आमदार होत्या. गरोदर असतानाही त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होत असत. अडीच महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन त्या विधानभवनात आल्या होत्या, तेव्हा आपण सभागृहात गेल्यावर बाळाचा सांभाळ कसा होणार, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी आधीच विधानमंडळाचे लक्ष वेधलेले होते, पण तरीही अगदीच अस्वच्छ खोली बाळासाठी देण्यात आल्यावर त्या संतप्त झाल्या, त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. त्यावर मग लगबग झाली आणि विधानभवनाच्या पहिल्या माळ्यावर मंत्र्यांच्या दालनाच्या रांगेत टापटिप असा हिरकणी कक्ष बनविला गेला. मात्र, पहिल्या माळ्यावरील हिरकणी कक्ष आता गायब झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR