हरियाणाची कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकच्या बाराव्या दिवशी होणा-या अंतिम सामन्यात स्थान मिळवून इतिहास घडविलेला असतानाच तिला अपात्र केल्याची बातमी धक्कादायक होती. अशा प्रकारचा अनुभव हा कोणत्याही खेळाडूला मानसिक आघात ठरणारा राहू शकतो. मात्र विनेश फोगटने ज्या पद्धतीने जिद्द दाखवत पॅरिसमधील मजल मारली, ते पाहता देशच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रीडाप्रेमींच्या भावना तिच्यासोबत असणे स्वाभाविक होते. आता देशातील संपूर्ण क्रीडा व्यवस्था ते राजकीय संस्कृतीपर्यंत सर्व बाजूची सखोल पडताळणी करण्याची वेळ आली आहे.
ऑलिम्पिकमधील भारताच्या सुमार कामगिरीबाबत जनतेतून नेहमीच नाराजीचा सूर उमटला आहे. १४० कोटींच्या देशात केवळ बोटावर मोजण्याइतपत येणारी पदके हा गंभीर चर्चेचा विषय आहे. नेमबाज मनू भाकरने दोन ब्राँझ जिंकल्याने देशाचे नाव पदकतालिकेत आले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने अंतिम फेरी गाठल्याने सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली गेली. पण दुस-याच दिवशी अघटित घडले. शंभर ग्रॅम वजनाने घात केला आणि तिला अपात्र ठरविले. अर्थात या कारवाईमुळे तिची कामगिरी नाकारता येत नाही.
एकार्थाने कुस्ती महासंघाच्या तत्कालीन अध्यक्षाविरोधात दंड थोपटणा-या विनेशची ऑलिम्पिकमधील अशी एक्झिट सर्वांनाच धक्कादायक ठरली. शिवाय या घटनेने भारतीय क्रीडा व्यवस्थेतील पोकळपणा चव्हाट्यावर आला आहे. ही कारवाई केवळ फोगटपुरतीच मर्यादित नसून ती भारतीय क्रीडा विश्वाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. हरियाणाची कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकच्या बाराव्या दिवशी होणा-या अंतिम सामन्यात स्थान मिळवून इतिहास घडविलेला असतानाच तिला अपात्र केल्याची बातमी धक्कादायक होती. अशा प्रकारचा अनुभव हा कोणत्याही खेळाडूला मानसिक आघात ठरणारा राहू शकतो. मात्र विनेश फोगटने ज्या पद्धतीने जिद्द दाखवत पॅरिसमधील मजल मारली, ते पाहता देशच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रीडाप्रेमींच्या भावना तिच्यासोबत असणे स्वाभाविक होते. प्रामुख्याने केवळ शंभर ग्रॅम वजन अधिक राहिल्याने तिला ऐतिहासिक कामगिरीपासून वंचित राहावे लागले. परिणामी तिने दुस-या दिवशी निवृत्ती जाहीर केले.
तत्पूर्वी विनेशच्या साथीदार कुस्तीपटूंनी या क्षेत्रात सुरू असलेल्या अनागोंदीच्या विरोधात आवाज बुलंद करत जगाचे लक्ष वेधून घेतले होते. कुस्ती महासंघाच्या तत्कालीन अध्यक्षांविरोधात लैंगिक छळासारखे गंभीर आरोप लावणे म्हणजे एकप्रकारे करिअर पणाला लावण्यासारखे होते. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून न्यायालयाच्या निकालाची वाट पाहिली जात आहे. अडथळ्यांची शर्यत पार करत विनेशने सीन नदी गाठली. पण तिने ५३ किलोऐवजी ५० किलोग्रॅम वजन गटात खेळण्याचा निर्णय घेतला. एरवी ५३ किलोचा सराव असलेल्या विनेशला भरपूर तयारी करावी लागली, मात्र वजन नियंत्रित ठेवण्यात तिला यश आले नाही आणि तेवढा अभ्यास करता आला नाही. उपान्त्य फेरी जिंकल्यानंतर तिने रात्रभर व्यायाम केला. केस कापले, कपडे देखील कमी केले. तरीही शंभर ग्रॅम वजन अधिकच राहिले. शेवटी तिला अपात्र जाहीर केले. परिणामी डिहायड्रेशनमुळे दवाखान्यात दाखल करावे लागले. यापूर्वीही २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत तिचे वजन काही ग्रॅम अधिक असल्याने बाहेर पडावे लागले होते. अर्थात दुस-या श्रेणीत खेळताना ती चांगली कामगिरी करत होती. परंतु जायबंदी झाल्याने तिला पुन्हा मैदानाबाहेर राहावे लागले. टोकिओ ऑलिम्पिकमध्ये ती छाप पाडू शकली नाही. अशावेळी पॅरिस ऑलिम्पिकमधील तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विनेशने कुस्ती महासंघाच्या विरोधात आवाज उठविल्याने तत्कालीन कर्ताधर्ता लोकांची नाराजी ओढून होती. एकंदरीतच क्रीडा व्यवस्थेतील एक गट विनेशसमवेत सकारात्मक नव्हता आणि म्हणूनच तिची पॅरिसवारीपर्यंतचा प्रवास सोपा राहणार नाही, हे देखील निश्चित झाले होते. हा संघर्ष म्हणजे तिची जिद्द होती आणि या बळावरच तिने ५० किलोग्रॅम श्रेणीत जागतिक आणि ऑलिम्पिक विजेती यूई सुसाकीला पराभूत केले. ती ८२ सामन्यांपासून अजिंक्य होती. शंभर ग्रॅम वजन अधिक राहण्यास केवळ कुस्तीपटूच नाही तर सहयोगी कर्मचारी देखील तितकेच जबाबदार आहेत. कुस्ती महासंघाचे सध्याचे अध्यक्ष संजय सिंह यांनी देखील फोगट यांच्या सहकारी कर्मचा-यांबद्दल आलेल्या तक्रारीची चौकशी केली जाईल, असे सांगितले.
मात्र आरोप-प्रत्यारोपांतून या प्रश्नांचे उत्तर मिळणार नाही. जे काही घडले ते दुर्दैवी होते. आता देशातील संपूर्ण क्रीडा व्यवस्था ते राजकीय संस्कृतीपर्यंत सर्व बाजूची सखोल पडताळणी करण्याची वेळ आली आहे. विनेशचा विचार केला तर तांत्रिक आधारावर पदक कोणाच्याही नावावर केले असले तरी जगातील क्रीडाप्रेमींच्या हृदयात विनेशची कामगिरी कोरली गेली आहे. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच एखादी भारतीय महिला कुस्तीच्या अंतिम फेरीत दाखल झाली होती. ती मंगळवारपर्यंत सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. परंतु एका रात्रीतून असे काय घडले की तिचे वजन वाढले आणि तिला अपात्र ठरविले. हा दीर्घकाळ चर्चेचा विषय राहील. त्यामुळे ऑलिम्पिकचे नियम हे अमानवी नाही तर अन्यायकारक आहेत, असेच म्हणावे लगेल. कालपर्यंत विनेशचे वजन योग्य असेल तर तोपर्यंत तरी तिच्या विजयाला मान्यता द्यायला हवी. एखाद्या खेळाडूचे वजन काही ग्रॅमने वाढत असेल तर मागच्या कामगिरीवर फुली मारणार का? त्यामुळे विनेश अंतिम सामना खेळू शकली नाही किंवा ती पात्र नसेल तर किमान तिला रौप्य पदक देणे अपेक्षित होते. अपात्र ठरल्याचे समजल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. ‘विनेश, तुम्ही चॅम्पियनचे चॅम्पियन आहात.
तुम्ही भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहात.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्विट हे मानसिक धैर्य खचण्यापासून परावृत्त करणारे आहे. पॅरिसमध्ये भारतीय संघावर देखरेख करणा-या माजी धावपटू पी. टी. उषा यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून यासंदर्भात योग्य पावले टाकण्याचे निर्देश दिले. विनेश फोगटची अपात्रता ही सर्व खेळाडूंना धडा आहे. एखाद्या पातळीवर कारस्थान किंवा गडबड होत असेल तर खेळाडूंनी एकत्र येऊन उणिवांवर बोट ठेवायला हवे. आज ज्या गोष्टी राहिल्या, त्या भविष्यात पुन्हा येऊ नयेत, यासाठी खबरदारी घ्यायला हवी. क्रीडा संस्कृतीची जाण नसलेल्या नेत्यांच्या मागे उभे राहण्यापेक्षा निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे. चांगला खेळ केला तरच पदके मिळतील, राजकारणाने नाही. आता क्रीडापटूंची योग्यता नाही तर त्यांच्या सहकारी कर्मचा-यांच्या पात्रतेवरही गांभीर्याने चर्चा व्हावी, तरच यशाचे फळ चाखायला मिळेल.
-सुचित्रा दिवाकर