लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या औद्योगिकरणाला अधिकची चालना मिळावी म्हणून औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रश्न मार्गी लागावेत या मागणीसाठी दि. १३ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालयात भेट घेतली. विमानतळ विस्तारीकरण, कृषी उत्पन्न बाजार समितीची उभारणी, औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक ३ मंजुरी, व इतर काही विषयाच्या अनुषांगाने यावेळी सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. हे सर्व प्रलंबीत प्रश्न मार्गी लागणार आहेत.
मंत्रालय, मुंबई येथे औद्योगिक वसाहतीह्याधील विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालयात भेट घेतली. लातूर एमआयडीसी अंतर्गत असलेल्या विमानतळाचे अंतिम टप्प्यात आलेले विस्तारीकरण थोडक्या जमिनीच्या अधिग्रहणाभावी थांबले आहे, ते अधिग्रहणकरुन नाईट लँडिंग सुविधेसह विस्तारीकरण लवकर पूर्ण करावे. जेणेकरुन या ठिकाणाहून प्रवासी तसेच कृषी मालाची व औद्योगिक उत्पादनांची मालवाहतूक सुरु होईल. त्याचबरोबर एअर अंबुलांसाठीही हे विमानतळ उपयुक्त ठरुन, रुग्णांना चांगल्या रुग्णालयात तातडीचे उपचार घेता येतील, यातून हे शहर आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून ही नावारुपाला येईल, अशी चर्चा यावेळी झाली.
जुन्या औद्योगिक वसाहतीमधील रस्ते खराब झाले आहेत तर नव्या औद्योगिक वसाहतीत आणखी काही ठिकाणी रस्ते बांधण्यात आलेले, काही प्लॉटसाठी वीज व पाणीपुरवठ्याच्या व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, पर्यावरण रक्षणासाठी औद्योगिक वसाहतीअंतर्गत नियमानुसार मोकळ्या जागा ठेवण्यात आलेले आहेत, तो हेतू साध्य करण्यासाठी त्या जागा सर्वसामान्यांच्या दृष्टीने मोकळ्याच ठेवण्यात याव्यात.
या सर्व मागण्यांसह लातूर येथील औद्योगिक विस्ताराच्या दृष्टीने या भेटीत विषयनिहाय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक चर्चा केली. सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या विषयावर लवकरात लवकर निर्णय होण्याच्या दृष्टीने संबंधित अधिका-यांची एकत्रित बैठक बोलवण्याची राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे. यावेळी सभापती जगदीश बावणे व सचिव अरविंद पाटील उपस्थित होते.