आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
कल्याणकारी योजना सुरूच राहणार : मुख्यमंत्री
मुंबई : लोककल्याणकारी योजनांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असला तरी राज्याची आर्थिक शिस्त आम्ही योग्यच ठेवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असो वा इतर कोणत्याही लोककल्याणकारी योजना राज्य सरकार बंद करणार नाही. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सुरू केलेल्या कोणत्याही योजना किंवा कामांना स्थगिती दिलेली नाही. या सर्व कपोलकल्पित बातम्या आहेत. माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणतेही कोल्डवॉर नाही असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विरोधी पक्षांनी त्यावर नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. धनंजय मुंडे यांच्याबाबत सरकारने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत न्यायालयात जो निर्णय येईल, त्यानुसार सरकार भूमिका घेईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जो कोणी अवमानकारक वक्तव्य करेल, त्याला अजिबात पाठिशी न घालता कठोर कारवाई करण्यात येईल. विरोधकांची संख्या कमी असली तरी कामकाज रेटून नेणार नाही. विरोधी पक्षाचा सन्मान ठेवूनच काम करू. त्यांनी सक्षम विरोधी पक्षासारखे काम करावे, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
विरोधकांनी ९ पाणी पत्र पाठवून घातलेल्या बहिष्काराची तिघांनीही खिल्ली उडवली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अजिबात बंद करणार नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वेगवेगळया योजनांचा ताण जरी असला तरी लाडकी बहीणसह कोणतीही कल्याणकारी योजना बंद करणार नाही. कारण राज्याची आर्थिक शिस्त आम्ही भक्कमपणे पाळली. फक्त कॅगच्या निर्देशानुसार जी व्यक्ती लाभास पात्र नसते त्यांचा समावेश योजनेत करता येत नाही. अशा योजनांना सर्वात जास्त पैसे देणारे महाराष्ट्र हे देशात एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या कोणत्याही योजनांना मी स्टे दिलेला नाही, किंवा त्यांच्या कामांची मी चौकशीही सुरू केलेली नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
छेडछाडीचे प्रकार
खपवून घेणार नाही
रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत झालेल्या प्रकरणासंदर्भात त्यांचे माझ्याशी बोलणे झाले आहे. त्या प्रकरणी कारवाई झालेली आहे. कोणत्याही नेत्याने या प्रकरणी कारवाई करू नये असा फोन केलेला नाही. ही दुर्दैवी घटना असून असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
विरोधकांचे तेच
तेच रडगाणे : शिंदे
विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला असला तरी त्यांनी आमच्या सोबत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर, शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करावी त्याला योग्य उत्तर देण्यात येईल. परंतु सूड भावनेतून सरकारला टार्गेट केले जात असेल तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.