मुंबई : प्रतिनिधी
सोमवारपासून अर्थात ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित करण्यात येणा-या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधकांकडून सरकारला घेरण्यासाठी तयारी केली आहे. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, संतोष देशमुख हत्याकांड, कृषी विभाग घोटाळा, प्रशांत कोरटकर प्रकरणावरून सरकारला घेरणार, असे पत्रकार परिषदेतून दिसून आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा बंगल्यावर पार पडली. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार भाई जगताप, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील प्रभू, आमदार आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.
अंबादास दानवे म्हणाले, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे तीन महिन्यांपासून फरार आहे. प्रशांत कोरटकर हा मस्ती आलेला व्यक्ती इंद्रजित सावंत यांना धमकी देतो. प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देते. कोरटकरला बेड्या घालून तुरुंगात टाकायला हवे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय-काय भूमिका व्यक्त केली. आता सरकारने सांस्कृतिक विभागामार्फत फिल्म सिटी समितीत राहुल सोलापूरकरचा समावेश केला आहे.
कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला होता. हीच परंपरा हे लोक सुरू ठेवत आहेत. त्याला सरकार संरक्षण देत आहे. ३०० कोटींचा कृषी विभागात घोटाळा झाला आहे. आरोग्य विभागातील कंत्राटाला आणि एसटीच्या १३१० बसेसला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. याचाच अर्थ आधीचे सरकार भ्रष्टाचारी होते. त्यावर सरकार पांघरूण घालण्याचे काम करत आहे, असा आरोप दानवेंनी केला.