मुंबई : अजित पवार हे सडेतोड आणि रोखठोक बोलण्यासाठी लोकप्रिय आहेत. अजितदादांनी त्यांच्या जुन्या व्हीडीओवर सुद्धा प्रतिक्रिया दिली. त्या व्हीडीओवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. विरोधी पक्षात असतानाचं माझं ते वक्तव्य बरोबर होतं. पण आता तसे म्हणणे चुकीचे ठरेल, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, कॉमेडियन कुणाल कामरा याच्या त्या गाण्यामुळे ‘गद्दार’ आणि ‘खुद्दार’चा वाद महाराष्ट्रात पेटला. त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी भिडले असतानाच कॉमेडियन कुणाल कामरा याने खरंच विडंबन केले की कुठला तरी बदला काढला, यावर सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरून मुंबईत वातावरण तापले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्षनेता होतो. विरोधी पक्षनेतेपदाच्या काळात मी जे काही बोललो आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो. त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्याच्यामुळे हे अशा जर मागच्या गोष्टी कोणी कोणी, काय काय बोलले हे पाहिले, तर त्या-त्यावेळी ती-ती व्यक्ती तशी वक्तव्यं करत असतात, असे अजित पवार म्हणाले. त्यावेळी मी जे बोललो ते योग्य होते, अशी भूमिका दादांनी घेतली होती. त्यानंतर अजितदादांनी केलेले रोखठोक वक्तव्य पण चर्चेचा विषय ठरले आहे.
कुणाल कामरा म्हणाला, आपण अजितदादा एकनाथ शिंदे यांना जे म्हणाले, तेच म्हणालो. यानंतर खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचा एक जुना व्हीडीओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. अजितदादा विरोधी पक्षात असतानाचा हा व्हीडीओ आहे. त्यात दादा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.
या व्हीडीओत अजितदादा एकनाथ शिंदे यांना उद्देशून गद्दार म्हणतात. शेंबड्या पोरालासुद्धा ‘५० खोके एकदम ओके’ हे कळायला लागल्याचा चिमटा काढताना दिसतात. या व्हीडीओचा आधार कुणाल कामरा याने घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.