लातूर : प्रतिनिधी
सहकार आणि साखर उद्योगाची मागदर्शक संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी कारखान्यास गळीत हंगाम २०२२-२३ साठीचा ऊत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमता पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे येथे दि. ११ जानेवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी दुपारी भव्य पुरस्कार वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हषवर्धन पाटील, माजी मंत्री, व्ही. एस. आय. चे संचालक दिलीपराव देशमुख, आबासाहेब पाटील यांच्यासह सहकार, साखर उद्योगासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रसंगी विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., पुणे यांच्याकडून उत्तरपूर्व विभागातील उत्कृष्ठ तांत्रीक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, अमृत जाधव, भारत आदमाने, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर यांच्यासह अधिकारी यांनी स्वीकारला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांनी जाहीर केलेल्या यावर्षीच्या पुरस्कारामध्ये यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील (मांजरा कारखाना, रेणा कारखाना व विलास कारखाना) या तीन साखर कारखान्याना राज्यस्तरावरील ४ पुरस्कार मिळाले आहेत. या कारखान्याचे लातूरच्या सर्वांगीण विकासात उल्लेखनीय योगदान आहे. सहकार आणि साखर उद्योगाच्या माध्यमातून शेतक-यांना शाश्वत उत्पन्नाचा कायमस्वरुपी चांगला मार्ग उपलब्ध केला यामुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. सहकारी संस्था आणि साखर उदयोगाच्या माध्यमातून येथील शेतक-यांसाठी केलेल कार्य, सभासदांशी बांधीलकी मानून केलेले कार्य, दैनदीन कामकाजातील नियोजन, आर्थीक शिस्त आणि सभासद, कामगारांसाठी राबवीलेले नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक मान्यवरांनी केले. यावेळी मिळालेल्या पुरस्कारा बद्दल कारखाना व्यवस्थापन, सर्व संचालक मंडळ आणि प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याने उभारणी पासून तांत्रीकदृष्टीने कारखाना अद्ययावत ठेवला. गत गळीत हंगामात मिल मधील उसाचा तंतुमय निर्देशांक-८४.२३ टक्के, रिडयूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन – ९६.१५, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा वापर, उस-४२ टक्के, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वीजेचा वापर-३१ टक्के किलोवॅट, उस गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ-१२.१७ टक्के या कामगीरीच्या आधारावर कारखान्याची तांत्रीक गुणवत्ता सर्वोत्कृष्ट ठरली आहे. या कामगीरीची इतर कारखान्याशी तुलना करता विलास कारखाना सरस ठरला आहे. हा पुरस्कार विलास कारखान्यास मिळाला याबद्दल मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकी, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार यांचे अभिनंदन केले आहे.