26 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeमहाराष्ट्रविल्सन, ढवळे यांना अखेर जामीन मंजूर

विल्सन, ढवळे यांना अखेर जामीन मंजूर

६ वर्षांनंतर होणार तुरुंगातून सुटका
मुंबई : प्रतिनिधी
शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेले संशोधक रोना विल्सन आणि कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना उच्च न्यायालयाकडून बुधवारी जामीन मंजूर केला. त्यामुळे सहा वर्षांनंतर दोघांची कारागृहातून सुटका होणार आहे. दोघांना जामीन मंजूर करण्याचा तपशीलवार आदेश नंतर उपलब्ध करण्याचेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

रोना विल्सन आणि ढवळे दोघेही खटल्याविना प्रदीर्घ काळापासून कारागृहात आहेत. तसेच त्यांच्यावर दाखल खटल्यात अद्याप आरोपनिश्चितीची प्रक्रियाही पार पडलेली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात त्यांच्यावरील खटला सुरू होऊन निकाली निघण्याची शक्यता नाही. शिवाय, तपास यंत्रणेकडून या प्रकरणी ३०० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर विल्सन आणि ढवळे दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने त्यांना दिलासा देताना नमूद केले.

दोघांना जामीन मंजूर करताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न न करणे, विशेष न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई सोडून जाऊ नये, पारपत्र तपास यंत्रणेकडे जमा करणे, तसेच राहत्या घराच्या पत्त्यासह वापरात असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकांची तपास यंत्रणेला माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने विल्सन आणि ढवळे या दोघांना दिले.

एनआयएसमोर नियमित
हजेरी लावण्याची अट
मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुख्यालयासमोर दर सोमवारी उपस्थिती लावण्याची नियमित अटही खंडपीठाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर सुटका करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR