25 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रविवेक कोल्हेंच्या संस्थांवर छापे

विवेक कोल्हेंच्या संस्थांवर छापे

उमेदवारी मागे घेण्यासाठी वाढवला होता दबाव
नाशिक : प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्याशी पंगा घेत अनेक निवडणुकांत थेट विखेंनाच आव्हान दिले आणि त्यात यशही मिळविले. आता त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपमध्ये असूनही त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोल्हेंशी संबंधित अनेक संस्थांवर धाड टाकण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हेंच्या अडचणी वाढू शकतात.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात विविध पथकांच्या माध्यमातून धाड टाकत चौकशी सुरू करण्यात आली. संभाजीनगर, पुणे आणि सोलापूर येथील पथक चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत नाशिकमध्ये पार पडलेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आता अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित अनेक संस्थांवर धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली. मद्यनिर्मिती प्रकल्प तसेच इथेनॉल प्रकल्प विभागातील कागदपत्रांची अधिका-यांकडून तपासणी केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यात संजीवनी शिक्षण संस्थेचीदेखील चौकशी केली जात आहे. गेल्या १४ तासांपासून कारखान्यातील विविध अधिका-यांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दबावतंत्राचा वापर!
आज उमेदवारी अर्ज माघारीसाठी अखेरचा दिवस असल्याने ही कारवाई केल्याचे बोलले जात असून अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे. आता या संस्थांवर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR