पाटणा : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिल्यावरून बिहार विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. संतप्त विरोधकांनी हौद्यात उतरत जोरात घोषणाबाजी केली. त्यांनी टेबल उलटून टाकण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.
राजद, काँग्रेस व डाव्या पक्षांचे विरोधी आमदार ‘बिहारविरोधी भाजपची लाज वाटते,’ असे लिहिलेले फलक हाती घेत सभागृहात पोचले. त्यापैकी काहीजणांच्या हातात लहान मुलांचा खुळखुळाही होता. बिहारला विशेष राज्याचा दर्जा व इतर मदत नाकारून केंद्राने राज्याच्या हाती ‘खुळखुळा’ दिल्याचे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. काँग्रेसचे शकील अहमद व इतर एक सदस्याने थेट विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांच्याजवळ जात खुळखुळा वाजविण्यास सुरूवात केली.
त्यानंतर, संतप्त झालेल्या अध्यक्षांनी सक्त कारवाईचा इशारा देत मार्शलना खुळखुळा घेऊन जाण्याचा आदेश दिला. सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर या गोंधळामुळे नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता ध्यानात घेत अध्यक्षांनी विरोधी सदस्यांना आसनावर जाण्याची सूचना केली.
ओडिशातही गदारोळ : ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांच्या मुलाने सरकारी कर्मचा-यावर हल्ला केल्यावरून ओडिशा विधानसभेत मंगळवारी, सलग दुस-या दिवशी गदारोळ झाला. त्यामुळे, सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. बिजू जनता दलाच्या मुख्य प्रतोद प्रमिला मलिक यांनी मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांच्या निवेदनाची मागणी केली. दास यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी करत पक्षाचे आमदार हौद्यात उतरले.