त्रिनिदाद : वृत्तसंस्था
टी-२० विश्वचषकात आज दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिल्या उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ९ विकेट्स राखत एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने तब्बल ३२ वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता दुस-या उपांत्य फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुस-या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगणार होता. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरू झाला. आता २९ जून रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दरम्याने विश्वविजेता संघ मालामाल होणार आहे.
टी-२० विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-२० विश्वचषकाची एकूण बक्षिसांची रक्कम ५.६ दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे ४६.७७ कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणा-या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत १३.३६ कोटी रुपये आहे तर उपविजेत्याला ६.६८ कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणा-या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकांत केवळ ५६ धावांवर सर्वबाद झाला. यामध्ये मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी संघाकडून सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने ८.५ षटकांत १ गडी गमावत ६० धावा करून विजय मिळवला.
दुसरीकडे २०२२ मधील याच दारुण पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ चांगल्या फॉर्मात आहे. विराट कोहलीसारखा फलंदाज फ्लॉप जात असतानाही भारतीय संघाने लौकिकास साजेशी कामगिरी केली. गुरुवारी इंग्लंडचा पराभव करत बदला घेऊन १६ महिन्यानंतर भारतीय संघ फायनलमध्ये धडक मारेल, अशी चाहत्यांना इच्छा आहे.
अफगाणिस्तानने टी-ट्वेंटी विश्वचषकात अत्युच्च कामगिरी बजावली. त्यामुळे यावेळी दक्षिण आफ्रिका संघालाही उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु द. आफ्रिकेने सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानवर पकड मजबूत केली. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला काहीही कमाल करून दाखविता आली नाही. उलट सुरुवातीलाच घसरगुंडी झाल्याने द. आफ्रिकेचा आत्मविश्वास दुणावला. त्यातूनच अफगाणिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला असून, युवा टीमचे यंदाचे स्वप्न धुळीस मिळाले.
सुपर-१२ मधून बाहेर पडलेल्या संघालाही बक्षीस
टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ३.३२ कोटी रुपये मिळतील तर सुपर-१२ टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांमध्ये ५.८५ कोटी रुपये वितरित केले जातील. म्हणजेच ही रक्कम सर्व संघांमध्ये विभागली जाईल, असे सांगण्यात आले.