लातूर : प्रतिनिधी
वृक्षांची संख्या कमी असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन करिता लातूरकरांनी पुढे यावे, असे आवाहन सुप्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वृक्ष संवर्धन हेल्पलाईनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते रविवारी बाभळगाव येथे झाले. यावेळी ते बोलत होते.
वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या आठ वर्षांपासून लातूर शहर आणि जिल्ह्यात पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी अभिनेता रितेश देशमुख यांना वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. वसुंधरा प्रतिष्ठानच्या झाडाचा गणपती, झाडांचे वाढदिवस, खिळेमुक्त झाड अभियान, सेल्फी विथ ट्री, एक घर:दोन झाड, वसुंधरा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्यामुळे नांदेड विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धन केल्याशिवाय डिग्री दिली जाणार नाही आदी विषयक यावेळी रितेश देशमुख यांना माहिती दिली. यावेळी रितेश देशमुख यांनी वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करीत वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यात प्रत्येक लातूरकर स्वत:हून सहभागी होईल आणि आपले लातूर हरित करण्यासाठी पुढे येईल असे आवाहन केले. वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे वृक्ष संवर्धन हेल्पलाईन ५ जूनपासून सर्वांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनचे उद्घाटन रविवारी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी करण्यात आले. ही हेल्पलाईन वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी उपयोगी पडेल असेही रितेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने अभिनेते रितेश देशमुख यांचा जास्वंद वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, सोशल मीडिया प्रमुख शिवाजी निरमनाळे, वुमन्स ंिवगच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई मस्के, रोहन शिंदे, नरसिंग सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
५ जूनपासून हेल्पलाईन सर्वांसाठी खुली; एका कॉलवर मिळणार माहिती येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम राबविले जाणार आहेत. वृक्षारोपण करताना कोणते झाड लावावे, खड्डा किती असावा, खत कुठले वापरावे, देशी आणि विदेशी झाडांतील फरक, रस्त्याच्या कडेला कुठली झाडे लावावीत आदी अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने ही मोफत हेल्पलाईन सुरू केली आहे. ५ जूनपासून ही हेल्पलाईन सर्वांसाठी खुली असणार आहे. वृक्षारोपण आणि संवर्धन करताना कुठलीही अडचण आली तर ८८८८८८४०२० या क्रमांकावर संपर्क साधल्यास माहिती दिली जाणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत ही हेल्पलाईन ५ जून ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत चालू राहणार आहे.