पुणे : विशेष प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतक-यांसाठी सगळ्यात चिंतेची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचा उतारा कमी आहे. उसाची वाढ खुंटल्याने वेळेआधीच उसाला तुरे फुटले आहेत. परिणामी ऊसाच्या उता-यावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के साखरेचे उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्यावर्षी ३१९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र २७० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस गाळप हंगाम मार्च अखेरीस संपण्याची शक्यताही महासंघाकडून वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ऊस गाळप हंगाम लांबणीवर पडला होता. त्यामुळे शेतक-यांना फटका बसला आहे. आता मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील यंदाचा ऊस गाळप हंगाम ऊसाअभावी मार्चच्या शेवटी संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाच्या ताज्या अहवालानुसार गेल्यावर्षी जानेवारीमध्ये देशातील ५२४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. यंदा मात्र देशातील ५०७ साखर कारखान्यांचे जानेवारीमध्ये गाळप सुरू आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी २०६ कारखाने सुरू होते. यंदा मात्र १९६ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. तर उत्तर प्रदेशमधील १२२ आणि कर्नाटकमधील ७७ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी अनुक्रमे १२० आणि ७४ कारखान्यांचे गाळप सुरू होते. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधने घातलेली आहेत. त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात बंदी हटवावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.