पुणे : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणेच्या नऊ महिन्यांच्या बाळाला अखेर तिच्या आईवडिलांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. सासरच्या मंडळींकडून झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्येप्रकरणी आता तिचे बाळ तिच्या आईवडिलांकडे सुपुर्द करण्यात आले आहे. आम्ही सकाळपासून बाळाला शोधत होतो. आम्हाला कॉल आला आणि एका ठिकाणी बाळ देण्यात आलं. मात्र कोणी बाळ दिलं याची माहिती नाही, अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली. १६ मे रोजी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
त्यानंतर बावधन पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हगवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मुळशीतील भुकूम इथली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना याप्रकरणी फोन केला होता. या प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचं ९ महिन्यांचं बाळ कुठे आहे, याचा तातडीने शोध घ्या आणि ते तिच्या आईच्या कुटुंबीयांना सुपुर्द करा, अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी दिली होती.
त्याचप्रमाणे वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे काही व्रण आढळले आहेत. याप्रकरणी बावधन पोलिस अधिक तपास करत आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत म्हटलंय. तिच्या शवविच्छेदन अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यापूर्वीच बावधन पोलिसांनी शशांक हगवणे, लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अद्याप फरार आहेत. वैष्णवीचा मुलगा नऊ महिन्यांचा आहे.