पुणे : प्रतिनिधी
शि. द. फडणीस यांनी काढून ठेवलेली व्यंगचित्रं ही वरवर सोपी आणि सहज वाटत असली तरी ती व्यंगचित्रं दिसायला सोपी आहेत परंतु ती सोपी नाहीत. त्यासाठी परिश्रम आणि चिंतनाची बैठकच लागते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या विद्यमाने ‘शि. द. १००’ या चार दिवसांच्या महोत्सवास सुरुवात झाली. व्यासपीठावर महोत्सवाचे निमंत्रक उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, लेखिका मंगला गोडबोले, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सव संयोजक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव, कार्टूनिस्ट्स कम्बाईनचे चारुहास पंडित आदी उपस्थित होते. ‘शिदं’चा सन्मान पुणेरी पगडी, उपरणे आणि मानपत्र देऊन करण्यात आला.
शंभराव्या वर्षात देखील फडणीस ज्या ताठ कण्याने चालत आहेत त्याच्या निम्या स्वाभिमानाने राज्य सरकारने सरकार चालवावे. याही झाडाची फळे हवीत, त्याही झाडाची फळे हवीत या हट्टाहासामुळे स्वत:चे हसे करून घेऊ नये. कल्पना सुचली परंतु त्याला साजेशा कल्पक व्यंगचित्राची जोड नाही मिळाली तर ती कल्पना रुचत नाही तसेच व्यंगचित्र उत्तम आहे परंतु कल्पना व्यंगचित्राला साजेशी नसेल तर ते व्यंगचित्र फसते म्हणून चांगले व्यंगचित्र अस्तित्वात येण्यासाठी दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.
महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्काराला उत्तर देताना व्यंगचित्रकार फडणीस म्हणाले की, राजकारणातले विशेष मला काही कळत नाही परंतु सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालले आहे ते तर अगदी समजण्यापलिकडचे आहे. चित्र ही एक भाषा आहे. या क्षेत्रात विविध प्रवाह असले तरी चित्रकलेची भाषा एकच असून राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शब्दविरहित सुसंवाद साधला जातो. ऑनलाईनच्या काळात स्केचबुकमधील रेषा पुसट न होता चित्रकारांनी अधिकाधिक बळकट करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव,कार्टूनिस्ट्स कम्बाईनचे संजय मिस्त्री यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्नेहल दामले यांनी केले.