मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात ‘व्होट जिहाद’ कामाला लागली आहे. या निवडणुकीसाठी चार दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे मालेगाव येथे बाहेर आले आहे. देशभरातून विविध बँक खात्यांतून मालेगावच्या बँकेत पैसे जमा झाले. १२५ कोटींहून अधिक पैसे जमा झाले आहेत. या प्रकरणी मालेगाव येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज अहमद फरार झाला आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगितले.
किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबई, मालेगाव, नाशिक, अहमदाबाद असे ३७ अकाऊंटमध्ये पैसे पाठवून त्यानंतर ते काढण्यात आले आहेत. सुमारे सव्वाशे कोटी रुपये व्होट जिहादमध्ये वापरण्यात येत आहेत. मी या संदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. तसेच सीबीआय आणि ईडीने ताबडतोब कारवाई सुरू करावी, अशी आपली मागणी आहे.
देशातील बँकांमध्ये पैसा जमा झाला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट आहे. १०० कोटी रुपये बाहेरून आले आहेत. हा पैसा विदेशातून आल्याची मला शंका आहे, असे सोमय्या यांनी म्हटले. ते म्हणाले, अवघ्या तीन दिवसांत बँकेत कुठून पैसे जमा झाले ते कळले पाहिजे. हे पैसे कुठून आले आणि कुठे गेले हे कळले पाहिजे.
ग्रामीण भागातील सहकारी बँकेत हे अकाऊंट उघडले जातात. तसेच ज्या नावाने बँक अकाऊंट उघडले ती सर्व खाती हिंदू व्यक्तींच्या नावाने आहेत. मालेगाव येथील मर्चंट बँकेच्या शाखेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये जवळजवळ १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. शिवसेना पदाधिकारी व बेरोजगार तरुण यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेत हे आरोप केले होते.
‘सामना’वर गुन्हा दाखल करणार
‘सामना’ वर्तमानपत्रावर आपण गुन्हा दाखल करणार आहोत, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. ‘सामना’ वृत्तपत्रातून पुन्हा माझ्या कुटुंबाची बदनामी सुरू आहे. आज पुन्हा एकदा वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. जुहूमध्ये मालमत्ता हडप करत असल्याचे त्यांनी ‘सामना’मधून सांगितले आहे. कोर्टात शिक्षा झाल्यानंतर अजूनही संजय राऊत यांनी धडा घेतलेला नाही, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.