कोल्हापूर : प्रतिनिधी
शेतक-यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत हाणून पाडणार, तसेच शक्तिपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला १२ जिल्ह्यांतील शेतक-यांचा आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्धार कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग कृति समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतक-यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शाहू स्मारक भवन येथे शक्तिपीठ महामार्गविरोधी कृति समितीच्या वतीने बारा जिल्ह्यांतील शेतक-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांनी आमची इंचभरही जमीन देणार नाही, वाडवडिलांकडून वारसा हक्काने आलेली जमीन सोडणार नाही, पिकाऊ शेतजमीन ही आमची भूमी आई आहे, अशी शपथ घेतली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. महामार्गासाठी जमीन संपादनाचे काम सुरू केले आहे; मात्र हा विकासाचा मार्ग नसून शेतक-यांना देशोधडीला लावणारा मार्ग आहे. हा मार्ग अंबानी, अदानी यांचा विकास करणारा मार्ग आहे. ७६ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणाच्या विकासाचा आहे..
शेतक-यांचे हित दिसत नाही ठेकेदारांचे हित दिसते. त्यामुळे हा मार्ग कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी भूमिका उपस्थित असलेल्या सर्व शेतक-यांनी मांडली. काही वर्षांपूर्वी आमच्या शेतीला पाणी मिळत नव्हते, कोरडवाहू जमिनीमुळे आमची हालअपेष्टा झाली. आता शेतीला पाणी मिळाले आहे, उत्तम प्रकारे पीक येऊ लागले आहे आणि चांगल्या कसदार जमिनी रस्ते प्रकल्पाच्या नावाखाली काढून घेतल्या जात आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत हा मार्ग उखडून टाकू, अधिका-यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.
परंतु, आता या शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातून १२ मार्चला एल्गार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमध्ये शक्तिपीठविरोधी परिषदेत आझाद मैदानात धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्यास तोही हाणून पाडा असे आव्हान आमदार सतेज पाटील यांनी केले.
आंदोलनाची पुढील दिशा कोल्हापुरात ठरणार
महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्यानंतर गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार केले आहेत. या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध असे सांगितले गेले. पण आजची ही उपस्थिती पाहता सर्व शेतक-यांचा विरोध आहे हे यावरून दिसून येते.
कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्येच शक्तिपीठ महामार्गावरून फाटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बोलताना शक्तिपीठ महामार्ग नको असेल तर तो रद्द करण्याची मी घोषणा करतो, नको असणारा प्रकल्प तुमच्यावर लादणार नाही, असे विधान केले होते. आता त्यांच्याच पक्षाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महामार्गाचे समर्थन केले आहे.
वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, असे म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग जाणार नाही. सांगलीपर्यंत कुणाचाही विरोध नाही त्यामुळे तिथे विरोध करायचा आमचा संबंध नाही. शक्तिपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाल्याचे हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
राजेश क्षीरसागर यांचे समर्थन
दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांनी समर्थन केले असले तरी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भूमिका अजून स्पष्ट समोर आलेली नाही. पहिल्यांदा विरोध केला असला, तरी आता पालकमंत्री म्हणून त्यांची भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्येच महामार्गावरून समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.