लातूर : प्रतिनिधी
सेव्हन महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी यांचे द्वारे प्रवरानगर येथे दि. ७ ते १६ जुलै या कालावधीत दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या ३० कॅडेटसनी यामध्ये सहभागी होऊन विविध नऊ पारितोषीके पटकावली. या प्रशिक्षणादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये शाहूच्या छात्रांनी एकूण नऊ पारितोषिके प्राप्त केली. सिनिअर अंडर ऑफिसर प्राची मोरे हिला बेस्ट कॅम्प सिनिअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅडेट अनुराधा काळे हिने बहारदार राजस्थानी लोकनृत्याचे सादरीकरण केले. प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
सिनिअर अंडर ऑफिसर प्राची मोरे, कॅडेट नेहा जाधव, कॅडेट अंजु कांबळे, कॅडेट अनुष्का गाथाडे, कॅडेट शितल राऊत यांनी महाराष्ट्रीयन लोकनृत्य आईचा गोंधळचे सादरीकरण केले. त्यांना या समुह नृत्यासाठीग्रुप प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. कॅडेट श्रावणी लगडे हिला बेस्ट अँकर अॅवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट गार्ड ऑफ ऑनरचे सादरीकरण केल्याबद्दल सिनिअर अंडर ऑफिसर प्राची मोरे, कॅडेट नेहा जाधव, कॅडेट तनुजा गरड, कॅडेट अनुष्का गाथाडे यांना सन्मानित करण्यात आले.
ड्रिल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल सिनिअर अंडर ऑफिसर प्राची मोरे, कॅडेट नेहा जाधव, कॅडेट तनुजा गरड, कॅडेट गौरी शिंदे, कॅडेट आरती कस्तुरे, कॅडेट संध्याराणी मुंगे, कॅडेट अनुष्का गाथाडे, कॅडेट अंजु कांबळे, कॅडेट नंदिनी जाधव, कॅडेट अश्विनी गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, कॅ. डॉ. ओमप्रकाश शहापुरकर, लेफ्टनंट डॉ. अर्चना टाक, लेफ्टनंट डॉ. महेश वावरे, डॉ. प्रकाश रोडिया यांनी त्यांचे अभिनंदन केले.
एकूण सात जिल्ह्यातील १६ शिक्षण संस्थातील एनसीसी छात्र (मुली) या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. लेफ्टनंट डॉ. अर्चना टाक यांनी शिबिरामध्ये सहभाग घेऊन एनसीसी अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. सेव्हन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या पीआय स्टाफने छात्रांना सैनिकी प्रशिक्षण दिले.