29.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदे गटात नाराजी!

शिंदे गटात नाराजी!

खात्यांत हस्तक्षेप, परस्पर धोरणात्मक निर्णयाचा धडाका
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने एकनाथ शिंदे आधीच नाराज असताना शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांमध्ये वाढलेला हस्तक्षेप, मंत्र्यांच्या कार्यालयातील नियुक्त्या करण्याबाबतच्या निर्णयाला होणारा विलंब, महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेताना सहकारी पक्ष म्हणून विश्वासात न घेणे आदी बाबींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी मंत्री कमालीचे अस्वस्थ आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर आपल्या खात्याच्या अधिका-यांना खरमरीत पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली.

आपल्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने पुढील काही काळ तरी सरकारचे नेतृत्व आपल्याकडेच राहील, अशी एकनाथ शिंदे यांची अपेक्षा होती; परंतु संख्येवर बोट ठेऊन भाजपाने हे पद आपल्याकडे घेतले. त्यामुळे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले असले तरी त्यांची नाराजी अजूनही पूर्णत: दूर झालेली नाही. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनावर आपली पकड मजबूत करताना पूर्वीच्या रचनेत मोठे बदल करण्याचे काम सुरू केले. नवीन सरकार आल्यानंतर मंत्र्यांचे स्वीय सहायक आणि ओएसडींच्या नेमणुकीसाठी नवी पद्धत सुरू करण्यात आली.

त्यानुसार आता प्रत्येक मंत्र्याकडे नेमण्यात येणा-या पीए आणि ओएसडीची पार्श्वभूमी तपासली जात असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच त्यांच्या नियुक्त्या होणार आहेत. यामुळे अनेक मंत्र्यांना अद्याप पीए आणि ओएसडी मिळू शकलेले नाहीत. भाजपाचे मंत्री याबद्दल काही बोलत नसले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. शिवाय आपल्या खात्याचे काही निर्णय परस्पर घेतले गेल्याने नाराजी आणखी वाढली आहे. मध्यंतरी एसटी भाडेवाढ करण्यात आली तेव्हा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना याबद्दलची कल्पनाही देण्यात आली नव्हती.

परस्पर निर्णयामुळे
उदय सामंत संतापले
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) तसेच उद्योग विभागाचे काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेतल्याचे लक्षात आल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सामंत यांनी स्वत:च्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांना खरमरीत पत्रही पाठवले. धोरणात्मक निर्णय, महत्त्वाचे निर्णय घेताना उद्योग सचिव तसेच मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी यांनी या बाबतची माहिती प्रथम मंत्र्यांना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कामकाजाबाबत सूचना,
मी नाराज नाही : सामंत
मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना आपण नाराज नाही तर पत्र लिहून फक्त कार्यपध्दतीबाबत सूचना दिल्याचे सांगितले. गेल्या काही काळात उद्योग विभाग व एमआयडीसीबाबतचे काही महत्त्वाचे निर्णय परस्पर घेण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले, हे निर्णय का घेण्यात आले, याची कारणे द्यावीत. तसेच महत्त्वाच्या फाईल्स, निर्णयाबाबत मला ब्रिफिंग द्यावे, असे उदय सामंत यांनी पत्रात म्हटले होते. ही नाराजी नाही तर विभागाने कसे काम करावे, ही अपेक्षा पत्रातून व्यक्त केल्याचे सामंत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR