लातूर : प्रतिनिधी
काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासावरील पुस्तकाची विटंबना करत ते फाडल्याच्या निषेधार्थ दि. १८ नोव्हेंबर रोजी लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. लातूर शहर व जिल्हा काँग्रेसचे प्रभारी डॉ. जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी जळगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
सायंकाळच्या सुमारास लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. आंदोलकांच्या हातात ‘शिंदे सेनेचा जाहीर निषेध’, असा ठळक मजकूर असलेला मोठा फलक होता. या वेळी कार्यकर्त्यांनी शिंदे गट आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला, तर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. निषेधाचे प्रतीक म्हणून शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या ‘रिकाम्या डोक्याचे’ स्वरूप दाखवत रस्त्यावर मातीची मडकी आपटून फोडण्यात आली.
या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्या प्रवक्त्यांना वेळीच आवर घालण्याचा इशारा दिला. सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलण्याची किंवा त्यांच्या पुस्तकाला हात लावण्याची या प्रवक्त्यांची पात्रता नसल्याचे सांगत, काँग्रेस हा आगीचा निखारा आहे, त्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल, असा इशारा आंदोलकांनी दिला. भविष्यात काँग्रेस पक्षाच्या किंवा नेत्यांच्या विरोधात, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली.
या आंदोलनात महापालिकेतील सभागृहनेते विजयकुमार साबदे, अॅड. किरण जाधव, काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. दिनेश नवगिरे, महादेव मस्के, आदमानेताई, तबरेज तांबोळी, फैजल कायमखानी, विकास कांबळे, बस्वराज धरणे, शाहिद पटेल, मारोती पांडे, आबासाहेब पाटील उजेडकर, प्रा. प्रविण कांबळे, विष्णुदास धायगुडे, अॅड. देविदास बोरुडे पाटील, रईस टाके, युनुस शेख यांच्यासह लातूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















