नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केल्यावरही अनेक मतदारसंघांमध्ये अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्षांनी नेत्यांनी दिले होते. परंतु तरीही काहींनी अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत हकालपट्टी केली होती, आता बंडखोर नेत्यांना मदत करणा-या पदाधिका-यांचे निलंबन करण्यात आले.
बेलापूर मतदारसंघातील शिवसेनेचे शिंदे गटातील सात पदाधिका-यांना दणका देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निलंबन केलं आहे. या विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विजयी नाहटा यांना मदत करणा-या पदाधिका-यांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या एका प्रचार सभेत बंडखोर उमेदवारांना साथ देऊ नका असे बजावले होते. मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरू होता, अखेर शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिका-यांच्या लक्षात हा सगळा प्रकार आल्यानंतर या सगळ्याची गंभीर तक्रार घेत त्या सात पदाधिका-यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.