शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार पडलेल्या वादळी वा-यासह अवकाळी पावसामुळे ऊस, तूर ही पीके आडवी पडली असून सोयाबीनच्या गंजी वरील ताटपत्री उडाल्याने शेतक-यांंची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने सोयाबीनच्या गंजी भिजल्याने शेतक-यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सरासरी २७.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने वातारणात बदल होऊन दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडी जाणवत होती.यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज देखील वर्तवला होता.अखेर मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने शेत शिवार ओलांिचब झाला असून या पावसाने शेतक-यांत थोडी खुशी थोडा गम सारखी परिस्थिती पहावयास मिळाली. दरम्यान यंदा परतीच्या पाऊस पाठ फिरविल्याने जमिनीतील ओलावा कमी होईल या भितीमुळे शेतक-यांंनी सोयाबीन राशी ऐवजी रबी पेरणीला प्राधान्य दिले.त्यामुळे अनेक शेतक-यांंच्या शेतात सोयाबीनच्या गंजी तशाच आहेत. त्यात या वादळी वा-यासह अवकाळी पावसाने गंजी भिजून सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तसेच या पावसाचा ऊस, तूर व भाजीपाला पिकांना देखील फटका बसला आहे.तालुक्यातील साकोळ या मंडळात सर्वाधिक २८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिसामाबाद मंडळात २६.८ मिलिमीटर तर त्यापाठोपाठ शिरूर अनंतपाळ मंडळात २६.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.