पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणीवर निर्जन स्थळी चाकूचा धाक दाखवत दोन नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर त्यांनी संपूर्ण घटनेचा व्हीडीओ तयार करून पीडितेकडे असलेले दागिने लुटून तेथून फरार झाले.
या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. पीडित महिला तिच्या चुलत भावासोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसली होती.
त्याच वेळी दोन अज्ञात तरुण दुचाकीवर तिथे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर पीडितेला आणि तिच्या चुलत भावाला आक्षेपार्ह स्थितीत येण्यास भाग पाडून संपूर्ण प्रकाराचा व्हीडीओ देखील शूट केला.
या गुन्हेगारांनी केवळ बलात्कारच केला नाही, तर पीडितेकडील सोन्याची नथ आणि पेंडंट घेऊन पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तसेच लुटलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.