लातूर : प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळा परिसरास महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे अवकळा आली असून आता मोकाट प्राण्यांचाही तिथे वावर वाढला आहे. दि. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनी अभिवादनासाठी नागरीक तेथे गेले असता त्यांना पुतळ्याच्या आतील भागात घाण दृष्टीस पडली व त्यांनी ती स्वता साफ केली. शहर स्वच्छतेप्रति बेफिकीर असलेल्या महापालिकेने नागरीकांची श्रद्धास्थाने असलेली महापुरुषांची स्मारके तरी किमान स्वच्छ ठेवावीत, त्यांचे पावित्र्य राखावे, अशी अपेक्षा करीत महापालिकेच्या अनास्थेचा शिवभक्तांनी यावेळी निषेध केला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा यावेळी मनपा प्रशासनास देण्यात आला.
मराठवाड्यातील अनेक शहरात छत्रपती शिवरायांच्या स्मारकांचे सुशोभिकरण तेथील प्रशासन व लोकप्रतीनिधींनी केले आहे. शिवकाळाला साजेल व सर्वांना समाधान देईल, अशी सजावट व स्वच्छता तिथे आहे. तथापि याबाबत लातूर शहरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा मात्र अपवाद ठरला आहे. महानगरपालिकेची अनास्था यास कारणीभूत आहे. पुतळ्याभोवतीच्या संरक्षण कठड्याचे पाईप तुटले् आहेत. कठड्याला दार नसल्याने रात्री-अपरात्री मोकाट प्राणी तिथे जात आहेत व घाण करीत आहेत. विजेच्या वायर अनेक ठिकाणी उघड्या आहेत. काही झाडे सुकली आहेत. शिवकाळास साजेल असे या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी गेली पाच वर्षांपासून लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चा पालिका आयुक्तांकडे करीत आहे.
यासाठी त्यांनी आयुक्तांची वेळोवेळी भेट घेऊन त्यांना निवेदने सादर केली आहेत. आयुक्तांना जायमोक्यावर बोलावून वस्तुस्थितीही दाखवली आहे. सुशोभिकरण आराखडाही त्यांना दिला आहे. असे असले तरी आजतागायत त्यावर महानगरपालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नाही. शिडी नसल्याने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कठीण झाले आहे. तेथील ध्वजस्तंभही शिवप्रेमींनी स्वखर्चातून उभारला आहे. वेळ मारुन नेण्यापुरती चर्चा करायची व त्यानंतर या कामांशी आपले काहीएक देणेघेणे नाही या भूमिकेत रहायचे, अशी मानसिकता महापालिका आयुक्तांनी या कामाबाबत अवलंबली असल्याचा आरोप यावेळी शिवप्रेमींनी केला.