छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग््रयाहून सुटकेसाठी पेटा-यांचा वापर केला नव्हता, तर औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पण त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, या लोकांना वेड लागलंय का? असा संतप्त सवाल भुजबळांनी केला. शिवाजी महाराज मोठ्या सफाईने सुटले. स्वराज्य निर्माण केलं. त्यांची सुटका ही हुशारी आणि रणनीतीचा भाग होता. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सोबत आले असते तर संकट आलं असतं. संभाजी महाराजांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडले होते. त्याविषयी माँसाहेब जिजाऊ यांनी विचारले होते हा इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.
राहुल सोलापूरकर महामूर्ख : आव्हाड
हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्त्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज आग््रयाहून लाच देऊन सुटले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस सध्या राज्याला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करणा-याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
वक्तव्य मागे घ्या : आनंद दिवे
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य माघारी घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. छत्रपतींचे बुद्धिचातुर्य आणि धाडसावर शंका घेणे हे पापच आहे. आग्रा येथून सुटताना महाराज लाच देऊन सुटले, हे राहुल सोलापूरकर यांचे विधान धक्कादायक आहे.