25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रशिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांची दिलगिरी

शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांची दिलगिरी

बीड : प्रतिनिधी
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आग््रयाहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटा-यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असे ते एका पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त झाला. यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग््रयाहून सुटकेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत एक व्हीडीओ जारी करत सोलापूरकर यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे.

जवळपास दीड-दोन महिन्यांपूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवर मी ५० मिनिटांची मुलाखत दिली होती. त्यातल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना मी इतिहासातल्या काही रंजक गोष्टी कशा बनतात, यावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग््रयाहून सुटकेबाबत काही गोष्टी बोललो. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्रे, फारसी-उर्दू अशा ग्रंथांमधल्या तरतुदी आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी या वाचायला आणि अभ्यासायला मिळाल्या होत्या.

त्यातल्याच काही गोष्टींवर बोलताना महाराजांनी कुणाला रत्ने दिली, कुणाला पैसे दिले आणि इतर काय काय केलं याबाबत मी सांगत होतो. या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करताना महाराजांनी औरंगजेबाच्या इतर लोकांना कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि कशी स्वत:ची सुटका करून घेतली, हे मी सांगताना लाच हा शब्द वापरला. साम-दाम-दंड-भेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची स्वत:ची सुटका करून घेतली हे मला सांगायचं होतं’’, असे ते म्हणाले.

शिवराय हे फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मला वेगळं काही सांगायची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजर्षि शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती. अत्यंत नेकीने हा सगळा इतिहास अभ्यासून, तसेच वंदनीय, पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक व्याख्याने मी जगभर अनेक वर्षे जेवढा माझा अभ्यास आहे, त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न करत असतो. जगभरातील लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी त्या पॉडकास्टमधली दोन वाक्ये काढून महाराजांनी लाच दिली असे हा बोलला असे म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत सोलापूरकरांनी आपली बाजू मांडली.

याविषयी दिलगिरी व्यक्त करत ते पुढे म्हणाले, माझे यावर प्रामाणिक सांगणे आहे की, यात महाराजांचा अवमान करण्याचा माझा नखभरदेखील हेतू नव्हता. पण लाच या शब्दामुळे शिवभक्त, शिवप्रेमी नाराज झाले असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी छत्रपतींचे गुणगान गातच मोठा झालोय. गड-किल्ल्यांवर मी वाढलोय. मी रायगडावरचा माहितीपट त्यासाठीच केला होता. त्यामुळे यावरून उगाच महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही म्हणाल तर मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर काही बोलणारच नाही. लाच हा शब्द महाराजांसाठी अजिबात नव्हता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR