28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मिलिंद देवरांच्या उमेदवारीला विरोध

मुंबई : प्रतिनिधी
वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदे गट राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे वरळीतील शिवसैनिक नाराज झाले असून येथे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आम्हाला स्थानिकच आमदार हवा असे म्हणत काळे फलक घेऊन वरळीतील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापला उमेदवार दिला आहे. शिंदे सेनेकडून दत्ता नरवणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी स्थानिकच्या शिवसैनिकांनी केली आहे. मागच्या वेळी युवराजाला आम्ही निवडून दिले. तो गेली पाच वर्षे कुठे होता, कोरोना काळात कुठे होता, असा सवाल या शिवसैनिकांनी केला आहे.

स्थानिक आमदार असेल तर काही अडचण आली तर त्याच्याकडे जाऊ शकतो. परंतु बाहेरचा उमेदवार आमदार झाला तर त्याच्याकडे अपॉईंटमेंट घ्यावी लागणार आहे, अशी व्यथा या शिवसैनिकांनी मांडली आहे. वरळीला स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. जर स्थानिक उमेदवार दिला नाही तर आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली आहे.

मनसेचे संदीप देशपांडे रिंगणात
वरळी मतदारसंघातून मनसेने संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरविले आहे. देशपांडे हे माहिमचे रहिवासी आहेत. तर आदित्य ठाकरे हे दादरचे रहिवासी आहेत. देशपांडे हे मनसेच्या विविध आंदोलनांमध्ये सहभागी असतात. यामुळे वरळीकरांमध्ये स्थानिकच आमदार हवाय अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या मतदारसंघात एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR