मुंबई : मी आज शिवरायांच्या चरणी डोकं ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी सावरकरांचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केले. काही लोक सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही, कोर्टात जातात असे मोदी म्हणाले होते. यावरून आता शरद पवारांनी मोदींना प्रश्न केला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, पुतळा पडला. माफी मागितली. पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनी माफी मागितली, हे मी ऐकले. त्यांनी माफी मागितली आणि लगेचच सांगितले की, सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते. त्यांच्यावर ज्यांनी टीका केली, त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. विषय काय? लोकांच्यातील अस्वस्थता काय? सावरकरांचे या ठिकाणी काय? सावरकर या देशाच्या स्वातंर्त्यासाठी अनेक वर्ष तुरुंगात गेले. हा त्याग त्यांनी केला, हे आपण मान्य करू. पण, सावरकर आणि शिवछत्रपतींची एकत्र चर्चा होऊ शकते का?, असा सवाल शरद पवारांनी केला.
हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली. मिळालेली सत्ता ही भोसलेंची सत्ता आहे, असे ते म्हटले नाही. रयतेचे राज्य स्थापन करण्याचा विचार ज्यांनी मांडला, अशा शिवाजी महाराजांची तुलना देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीने करतात. त्यातून माफी मागितली, माफी मागितली, हे सांगितले जाते अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.
चुकीच्या गोष्टींना प्रोत्सहित करता
याचा अर्थ असा की, चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार यांना तुम्ही प्रोत्साहित करता. ते अंगाशी आले की, मग माफीच्या नावाने सुटका करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशाच्या हातात या राज्याची सत्ता पुन्हा द्यायची की नाही हा विचार करायचा आहे असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला.